महिलेला विवस्त्र करून मारहाण झाल्याची माहिती, रिक्षाचालकाच्या छेडछाडीमुळे तरुणीने घेतली धावत्या रिक्षातून उडी
औरंगाबाद/प्रतिनिधी
औरंगाबाद शहरामध्ये महिलांना छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरात एकाच दिवशी दोन महिलांची छेडछाड करण्यात आली. एक औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा एका महिलेची छेडछाड केली गेली आहे. आरोपींनी महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्यानंतर रस्त्यावरील नागरिक मदतीला धावून आले. तर दुसरी रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीची रिक्षाचालकाडून छेडछाड करण्यात आली. त्यांनतर आपला जीव वाचवण्यासाठी तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारली. यात तरुणीची गंभीर जखमी झाली आहे. तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झालीय.
महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार
औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा रस्त्यावरच एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. तसेच छेड काढत तिचे कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपींनी महिलेचे कपडे फाडल्यानंतर रस्त्यावरील नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी या विवस्त्र महिलेला स्वतःचे कपडे दिले. आरोपींनी पीडित महिलेचे कपडे फाडून जबर मारहाण केली. तसेच या महिलेच्या शरीरावर चावाही घेतला आहे. महिलेला रिक्षातून उतरवत छेडछाड करणे आणि कपडे फाडण्यापर्यंत आरोपींची मजल गेली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
रिक्षाचालकाच्या छेडछाडीमुळे तरुणीने घेतली धावत्या रिक्षातून उडी
एक महाविद्यालयीन तरुणी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास ट्यूशनला जाण्यासाठी जालना रोडवर मोंढा नाका येथून रिक्षात बसली. ती तरुणी रिक्षात एकटी होती. त्यामुळे रिक्षाचालकाने ती एकटी असल्याचा फायदा घेत तिची छेड काढण्यास सुरुवात केली. तरुणीने आरडा ओरडा करुन रिक्षा थांबवायला सांगितले परंतु रिक्षाचालकाने तिचे ऐकले नाही. अखेर चालत्या रिक्षातून खाली उडी मारुन तरुणीने नराधम रिक्षाचालकाच्या ताब्यातून आपला जीव वाचवला. रिक्षातून उडी मारल्याने तरुणीच्या तोंडाला आणि हाता पायांना गंभीर दुखापत झाली. तरुणी रिक्षातून पडल्याचे पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोक तिच्या मदतीसाठी धावले. तरुणीची अवस्था पाहून तिला धीर देत तिच्या कुटुंबियांना बोलावले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर तरुणीची प्रकृती स्थीर आहे तिला सध्या घरी पाठवण्यात आले असून पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.