प्रतिनिधी / रत्नागिरी
रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मागवलेल्या औषधसाठ्याला पाय फुटले आणि तो रत्नागिरीच्या आठवडाबाजारात जाऊन पोहोचला. पोलिसांनी संशयास्पद परिस्थितीत तो पकडला. पुढे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर तो साठा शासकीय रुग्णालयाचाच असून औषध विभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे पुढे आले. याप्रकरणी जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
५ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळच्या वेळेत आठवडा बाजार येथे एका दुकानासमोर औषधाच्या बॉक्सने भरलेला टेम्पो पोलिसांना आढळला होता. याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला. मात्र हा औषधसाठा नेमका कोणाचा आणि आठवडा बाजारात कसा पोहोचला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली होती. प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याकडे सादर केला आहे.
या सर्व प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. तो औषधसाठा सिव्हिल हॉस्पिटलचा असून यामध्ये कोणत्याही खासगी दुकानाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. सिव्हिलच्या औषध विभागातील निष्काळजीपणामुळे हा टेम्पो आठवडा बाजारात गेला होता. चौकशीमध्ये चुकीच्या पत्त्यामुळे औषधे भरलेला टेम्पो बाजारात आल्याची माहिती पुढे आली. औषध विभागातील कर्मचारी, अधिकारी यांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. संबधितांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शासकीय रुग्णालयाच्या भंडाराकडून काही महिन्यांपूर्वी औषधे मागवण्यात आली होती. कोरोना काळात अन्य औषधांचा पुरेसा पुरवठा साऱ्या राज्यात असताना रत्नागिरीत मात्र रुग्णालयाच्या औषध मागणीची पूर्तत उशिराने करण्यात आली. औषध भांडाराने यासाठी आवश्यक पाठपुरावा न केल्याने हा गोंधळ झाला. हा निष्काळजीपणा आहे, याबाबत औषध भंडारातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे पत्र जिह्याधिकाऱ्यांनी दिले आहे. आता सिव्हील सर्जन कोणती कारवाई करणार आणि कोण दोषी आहेत, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पत्ता कुणी व चुकीचा का दिला ?
ऑक्टोबरमध्ये आठवडा बाजारातील ज्या पद्मावती कलेक्शनसमोर औषधाने भरलेला टेम्पो उभा होता, त्या पद्मावती कलेक्शनचा या औषध प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद केले आहे. मात्र पत्ता चुकीचा कोणी व का दिला, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. याबरोबरच याआधी असे घडले होते का, औषधाच्या प्राप्त व वापरलेल्या औषधांचा हिशोब जुळतो अथवा कसे, याबाबत चौकशी झाली अथवा कसे, हे समजू शकले नाही.