वृत्तसंस्था/ हैदराबाद
कोरोनाच्या काळात विविध औषधांच्या निर्मितीवर भर दिला जात असून याचा फायदा औषध क्षेत्राला झाला आहे. औषध क्षेत्राची निर्यात पहिल्या सहामाहित 15 टक्के इतकी वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2021 विक्रमी पातळी गाठली जाण्याचा अंदाज बांधला जात आहे.
आर्थिक वर्षात निर्यात 23 अब्ज डॉलर्सवर पोहचण्याची शक्यता सांगितली जात असून एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात 11.78 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. वर्षाच्या तुलनेत ही निर्यातीतील वाढ 14 टक्के इतकी आहे. भारतातून इतर देशांकडून मोठय़ा प्रमाणात औषधांची मागणी होताना दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या औषधासोबत हर्बल औषधांची निर्यातही वाढली आहे. आर्थिक वर्षाअखेर निर्यात 23 किंवा 24 अब्ज डॉलर्सवर पोहचू शकते. जैविक औषधांसह इतर औषधांची निर्यात वाढली आहे. मागच्या आर्थिक वर्षात भारताने 20.58 अब्ज डॉलर्सची औषधे निर्यात केली होती.