कोलंबो / वृत्तसंस्था
रवी बोपाराने 50 चेंडूत 59 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर कँडी वॉरियर्सने लंका प्रीमियर लीग स्पर्धेत डम्बुला जायंट्स संघाला नमवत या स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. जायंट्सला निर्धारित 20 षटकात 9 बाद 130 धावांवर रोखल्यानंतर कँडी वॉरियर्सने 19.2 षटकात 4 बाद 135 धावांसह विजयाचे लक्ष्य गाठले.
रवी बोपाराने 59 धावांच्या खेळीत 3 चौकार व 2 षटकार फटकावले. याशिवाय, सलामीवीर केन्नर लुईस व अँजिलो परेरा यांनी अनुक्रमे 27 व 29 धावांचे योगदान दिले. जायंट्सने चरिथ असलंका, मिनोद भानुका व कमिंदू मेंडिस यांना स्वस्तात बाद केले. मात्र बोपारा व परेरा यांनी 60 धावांची भागीदारी साकारत संघाला विजयपथावर आणले. डम्बुलातर्फे रमेश मेंडिसने 28 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. बिनुरा फर्नांडोने 22 धावात 3 तर अल-अमिन होसेनने 32 धावात 3 गडी बाद केले.