ऑनलाईन टीम / मुंबई :
कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारे अनधिकृत बांधकाम तोडले जात आहे.
महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना 24 तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
- लोकशाहीचा मृत्यू : कंगना
दरम्यान, कंगना चंदीगड मधून मुंबईला येण्यासाठी निघाली आहे. कारवाई सुरू झाल्यानंतर कंगनाने कारवाईचे फोटो ट्विट करत मुंबईला पुन्हा एकदा पाकिस्तानची उपमा दिली आहे.
तत्पूर्वी एक ट्विट करत तिने बाबर आणि त्यांची फॅमिली असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला. तसेच लोकशाहीचा मृत्यू असा हॅशटॅगही दिला आहे.
यापूर्वी कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे. कंगनाने म्हटले आहे की, मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम, असे ट्विट केले होते.