शाळा इमारतीसाठी जागृती सभेचे आयोजन : दानशूर व्यक्ति-माजी विद्यार्थ्यांच्या मदतीचा मोठा हातभार
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
गावातील मराठी उच्च प्राथमिक शाळेला 110 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. शासकीय मदत, दानशूर व्यक्ती तसेच माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या देणगीतून सुसज्ज अशी दुमजली इमारत बांधण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने माजी विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यासाठी गल्लोगल्लीत नुकतीच जागृतसभा घेण्यात आली. सभेमध्ये माजी विद्यार्थी व ग्रामस्थांकडून देणगी जमा करुन शाळेची इमारत पूर्ण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्याला उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मराठी शाळेची 1910 साली स्थापना झाली. मध्यंतरी शासकीय तसेच दानशूर व्यक्तींच्या मदतीतून शाळा खोलींचे बांधकाम करण्यात आले. आज शाळेला 110 वर्षे पूर्ण होत आहेत. 2010 साली या शाळेला 100 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाळेचा शतकमहोत्सव कार्यक्रमसुद्धा मोठय़ा उत्साहात साजरा केला. शासकीय मदतीतून शाळेची नूतन इमारत बांधण्यासंदर्भात अनेकवेळा शिक्षण खात्याकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तसेच जीर्ण इमारती मुलांच्या जीवितास धोकादायक ठरत असल्यामुळे माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनीच एकीच्या माध्यमातून नूतन शाळा इमारत उभारण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी गावामध्ये जागृती सभांच्या माध्यमातून शाळा व शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याच्या कार्याला सुरुवात केली असल्याचे सांगितले.
अन् माजी विद्यार्थी एकवटले
शाळेचे ऋण फेडण्यासाठी तसेच आपली माय मराठी जपण्यासाठी या शाळेचे माजी विद्यार्थी एकवटले.आणि त्यांनी शासकीय, दानशूर व्यक्ती तसेच माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून आपल्या गावच्या मराठी शाळेची सुसज्ज अशी दुमजली इमारत उभी करण्याचा संकल्प गेल्या सहा महिन्यापूर्वी शाळेच्या पटांगणामध्ये बोलाविलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सभेमध्ये केला.
सव्वादोन कोटीचा खर्च अपेक्षित
शाळेची दुमजली इमारत उभी करण्यासाठी जवळजवळ सव्वादोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यासाठी शासकीय, दानशूर व्यक्तीं व माजी विद्यार्थ्यांची मदत फार महत्त्वाची आहे. जागृती सभा कलमेश्वर गल्ली, नेताजी गल्ली, लक्ष्मी गल्ली, चव्हाट गल्ली, बाहेर गल्ली, मराठा कॉलनी, मसणाई गल्ली, शास्त्रीनगर आदी भागामध्ये घेण्यात आली.
यावेळी माजी विद्यार्थी शंकर कोनेरी, राजू मन्नोळकर, मारुती अष्टेकर, मोहन भैरटकर, सदानंद चव्हाण, यल्लोजी पाटील, विशाल पाटील, अमोल पाटील, भरत पाटील, भरमा पाटील, यल्लाप्पा ना. पाटील, यल्लाप्पा मा. पाटील, अमोल कोनेरी, गोपाळ पाटील, सुशांत हुरुडे, किरण तरळे आदींनी आपापले मनोगत व्यक्त
केले.
तसेच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार सतीश जारकीहोळी, आमदार महांतेश कवटगीमट, हिंडाल्को अधिकारी विश्वास शिंदे आदी मान्यवरांनीही शाळा पूर्णत्वासाठी जास्तीतजास्त निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.
जागृती सभांचे सूत्रसंचालन व आभार महिला विद्यालयाचे शिक्षक पुंडलिक पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने जागृती सभेची सांगता झाली. यावेळी नागरिकांमध्ये सामाजिक अंतर ठेऊन ही सभा पार पडली. मातृभाषेलाच अधिक महत्त्व
आज इंग्लिश माध्यम शाळांचे फॅड आले आहे जो तो आपली मुले इंग्लिश माध्यम शाळेमध्ये पाठविण्यासाठी मोठमोठी डोनेशन व मोठी फी भरून मुलांना शाळेला पाठविण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत. इंग्लिश माध्यममध्ये आपला मुलगा शिकला म्हणजे तो पुढे मोठा अधिकारी बनतो, असा समजही अनेक पालकांच्या मनामध्ये आहे. पण आज आपण पाहतो मोठमोठय़ा पदावर आयपीएस किंवा आयएएस अधिकारीसुद्धा आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊनच त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि हेच ध्येय आम्ही डोळय़ासमोर ठेऊन या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थीही आयपीएस किंवा आयएएस किंवा अन्य उच्च पदांवर जावेत या इच्छेपोटी ही मराठी शाळा दुमजली उभारण्याचा संकल्प केला असल्याचे या सभांमध्ये अनेकांनी बोलून दाखविले.