वार्ताहर /कंग्राळी खुर्द
‘कंग्राळी खुर्दचा रस्ता, वाहनचालकांचा खस्ता! या मथळय़ाखाली रस्त्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे वृत्त तरुण भारतमधून प्रसिद्ध झाल्यामुळे याची दखल घेऊन कंग्राळी खुर्दच्या रस्ताकामाला गती आली आहे. शिवाय रस्त्यामधील अनेक अडचणी कमी झाल्या आहेत. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीने ग्रामपंचायत अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी सुंदर शहराचे व्यवस्थापकीय अधिकाऱयांची भेट घेऊन रस्ता त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती. यामुळे कामाला गती आली आहे. याबद्दल वाहन चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ता आणि गटारीचे काम संथगतीने होत असल्याने ग्रामस्थांना होणारा त्रास याबाबत ग्रामपंचायतीने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय शिवमूर्तीपासून उत्तरेकडील पाणी निचरा होण्याची समस्या सांगण्यात आल्याने त्यांनी सुंदर शहराचे वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी प्रविण बागेवाडी यांच्याशी संपर्क साधला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या मागच्या बाजूने पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था आणि परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे सांगण्यात आले. सर्व कामे गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या सूचनाही दिल्या. याची दखल घेत प्रविण बागेवाडी यांनी या खात्याचे अभियंता आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन युवराज कदम यांनी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत चेअरमन यल्लाप्पा पाटील, माजी जि. प. सदस्या सरस्वती पाटील, ग्रा. पं. सदस्यांसमवेत रस्ता, गटारी, शिवमूर्ती परिसराची पहाणी करून लवकर कामाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्षा ज्योती पाटील, रमेश कांबळे, प्रशांत पाटील, कल्लाप्पा पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, राकेश पाटील, केंपाण्णा सनदी, धनंजय तुळसकर, कमला पाटील, सुनिता जाधव, महेश धामणेकर, भाग्यश्री गौंडवाडकर, मधुमती पाटील, मीना मुतगेकर, रेखा पावशे, राधा कांबळे उपस्थित होत्या.