वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या बेळगाव शहरात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ केला. याला विरोध दर्शविण्यासाठी म. ए. समितीच्यावतीने व्हॅक्सिन डेपो येथे महामेळावा भरविण्यात आला. त्यावेळी मध्यवर्ती म.ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांनी शाईफेक केली. कंग्राळी खुर्द म. ए. समिती व मराठी भाषिकांच्यावतीने मंगळवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.
यावेळी गावातील सर्व संघ, संस्था, किराणा दुकानांसह सर्व व्यवहार बंद ठेवून एकीची वज्रमूठ दाखवून दिली. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकारने हलगा-बस्तवाड येथील मराठी भाषिकांची सुपीक शेतजमीन काडीमोल दराने घेऊन करोडो रुपये खर्च करून विधानसौध बांधली. त्यानंतर बेळगाव कर्नाटकाचे हे दाखविण्यासाठी मराठी भाषिक बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या उद्देशाने बेळगाव येथे करोडो रुपयांचा चुराडा करून अधिवेशन भरवत आहे. अधिवेशन भरवायला विधानसौध बांधलेली जागा मराठी भाषिकांची परंतु मराठी भाषिकांवरच अन्याय होत आहे. असे कृत्य आम्ही कदापि सहन करणार नाही, अशाही संतापजनक प्रतिक्रिया निषेधप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांतून व्यक्त होत होत्या.