नशेत झालेल्या भांडणानंतर घडला प्रकार, मारेकऱयाला अटक : एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
नशेत झालेल्या भांडणानंतर चाकूने भोसकून एका युवकाचा भीषण खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशिरा कंग्राळी खुर्द येथे ही घटना घडली आहे. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून तोही जखमी झाला आहे.
शंकर गजानन पालकर (वय 32 रा. रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी महेश विठ्ठल जांभळेकर (वय 28 रा. रामनगर तिसरा क्रॉस) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
या घटनेत भीष्म अर्जुन वाघे (वय 31 रा. कंग्राळी खुर्द) हा युवकही जखमी झाला आहे. त्याच्यावर व संशयित आरोपी महेशवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. शनिवारी रात्री कंग्राळी खुर्द येथील पहिल्या बस स्टॉपजवळील खुल्या जागेत रंगीत पार्टी रंगली होती. पार्टीच्यावेळी नशेत मित्रामित्रांमध्ये झालेल्या वादावादीतून हा प्रकार घडला आहे.
दारूची नशा चढल्यानंतर आधी भीष्मवर हल्ला करण्यात आला. मोबाईल घेण्यावरून शंकर व संशयित आरोपी महेश यांच्यात वादावादी झाली. शंकरजवळ चाकू होता. तोच चाकू हिसकावून महेशने त्याला भोसकले. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या शंकरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मित्रावर चाकू हल्ला केल्यानंतर महेशने थेट आपले घर गाठले. चाकू बाहेर काढताना त्याच्या बोटालाही इजा पोहोचली होती. जखमेवर कपडा बांधून तो झोपला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शंकर पालकरकारागृहातून सुटला होता
खून झालेल्या शंकर पालकरवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. अलीकडेच तो कारागृहातून सुटला होता. तो पेंटिंगचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे. नशेत झालेल्या भांडणातून त्याचा खून करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महेश जांभळेकर याची रविवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.