वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
येथील बाल संभाजी युवक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित बैलजोडीने गाडी पळविण्याच्या शर्यतीमध्ये श्री सिद्धेश्वर प्रसन्न जाफरवाडी यांच्या बैलजोडीने 1920 फूट अंतर बैलगाडी पळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर बेनकाई देवी प्रसन्न बेटगिरी यांच्या बैलजोडीने 1915 फूट अंतर ओढून दुसरा क्रमांक मिळविला. त्यांनी अनुक्रमे 31 हजार रुपये व 25 हजार रुपये असे बक्षीस मिळविले. शर्यत उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सेवा दूध डेअरीचे चेअरमन शंकर पुंडलिक पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून मृणाल हेब्बाळकर, इंजिनियर राजकुमार पाटील, पत्रकार सदानंद चव्हाण उपस्थित होते.
मृणाल हेब्बाळकर, जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, केएसआरटीसीचे निवृत्त कर्मचारी दुर्गाप्पा कांबळे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य उमेश पाटील, नवनाथ पुजारी, यल्लोजी पाटील यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. लक्ष्मी फोटो पूजन ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले व ग्रा. पं. सदस्या रेखा इंडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यल्लोजी पाटील यांनी श्रीफळ वाढविले.
यावेळी मृणाल हेब्बाळकर, ग्रा. पं. माजी अध्यक्ष दत्ता पाटील, ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील, बंदेनवाज सय्यद आदींच्या हस्ते बैलगाडीचे पूजन करून शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी बाल संभाजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे भगवे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी मृणाल हेब्बाळकर, अरुण कटांबळे, राजकुमार पाटील, यल्लोजी पाटील, संध्या चौगुले, सदानंद चव्हाण आदी मान्यवरांनी उपस्थित शेतकऱयांना मार्गदर्शन केले. सदर शर्यतीमध्ये जवळजवळ 42 बैलजोडय़ांचा सहभाग होता.
बक्षीस वितरण समारंभ
शर्यत समाप्तीनंतर आयोजिलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. माजी अध्यक्ष दत्ता पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, दादासाहेब भदरगडे, ग्रा. पं. माजी अध्यक्ष विठ्ठल कोळी, उमेश पाटील, मयूर बसरीकट्टी, सरकारी कंत्राटदार प्रभाकर पाटील, जयराम पावशे, लक्ष्मण हुरुडे, देवाप्पा निलजकर, गुंडू हुरुडे, मल्लाप्पा निलजकर, नितीन पवार, गणपत निलजकर, बळवंत निलजकर आदी उपस्थित होते. यावेळी विजयी बैलजोडी मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सदर शर्यतीचे समालोचन व सूत्रसंचालन पुंडलिक पाटील, यल्लाप्पा पाटील व बसवंत पाटील यांनी केले. शर्यत व्यवस्थित पार पाडण्यासाठी बाल संभाजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
विजयी बैलजोडी मालकांची नावे खालीलप्रमाणे प्रथम-सिद्धेश्वर प्रसन्न जाफरवाडी, द्वितीय-बेनकाईदेवी प्रसन्न बेटगिरी, तिसरा-श्री लक्ष्मीदेवी प्रसन्न (मुतगा), चौथा -श्री भदरगडे प्रसन्न (सांबरा), पाचवा – मंगाईदेवी प्रसन्न (वडगाव), सहावे-मृगशहा बल्ली बाबा (एम. के. हुबळी), सातवे-शिवाजी मल्लेशी कणबरकर (मुतगा), आठवे-कलमेश्वर प्रसन्न (बसवण कुडची), नववे-पांडुरंग प्रसन्न, दहावे – चव्हाटा प्रसन्न (वाघवडे).