वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येथील बाहेर गल्लीतील राहत्या घराच्या परसातील जनावरांचा गोठा व शेडला आग लागून 1 लाखाचे नुकसान झाले. सदर घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता घडली असून आगीचे कारण समजू शकले नाही.
गोपाळ वैजू पाटील असे नुकसानग्रस्त शेतकऱयाचे नाव असून पाटील यांच्या राहत्या घराच्या परसामधील गोठा व शेडमध्ये असलेले तीन टॅक्टर गवत व जळावू लाकडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गोपाळ पाटील यांच्या राहत्या घराच्या परसामध्ये त्यांचा गोठा व शेड आहे. पाटील यांनी गोठा व शेडमध्ये गवत व जळाऊ लाकडे ठेवली होती. शुक्रवारी दुपारी गोठय़ातील गवताला आग लागल्याचे दिसून आले. शेजाऱयांनी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे पाटील यांचे गवत, लाकडे व पत्रे जळून खाक झाले. काकती पोलीस स्टेशनचे बसय्या लकुंडी व महादेव यरगुड्डी यांनी पंचनामा केला.