कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड ग्राम पंचायतीच्या दोन जागांसाठी सोमवारी पोटनिवडणूक झाली. वॉर्ड क्र. 10 मध्ये 61 टक्के मतदान झाले तर वॉर्ड क्र. 13 मध्ये 80 टक्के मतदान झाले. दोन्ही वॉर्डामध्ये चुरशीने मतदान झाले. मतदारांनी कुणाला कौल दिला, हे 30 डिसेंबर रोजी होणाऱया मतमोजणीनंतर समजणार आहे. कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीमधील वॉर्ड क्र. 10 मधील आनंद पम्मार यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त होती. वॉर्ड नं. 13 मधील सुजाता सुरेश जठार यांचे निधन झाल्यामुळे तीही जागा रिक्त होती. शासनाच्या आदेशानुसार वरील दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आल्यामुळे दोन्ही वॉर्डामध्ये तिरंगी लढत झाली.
वॉर्ड क्र. 10 मध्ये 963 मतदारांपैकी 580 मतदारांनी आपला हक्क बजावला. वॉर्ड क्र. 13 मध्ये 1420 मतदारांपैकी 1029 मतदारांनी आपला हक्क बजावला.
दोन्ही वॉर्डामध्ये सकाळी 7 पासून दुपारपर्यंत चुरशीने मतदान झाले. दुपारी 2.30 नंतर धीम्या गतीने मतदान झाल्याचे दिसून आले. वॉर्ड क्र. 10 मधील मतदार यादीमध्ये एकाच मतदाराचे तीन तीन ठिकाणी नाव नोंद असल्याचे आढळून आल्यामुळे गोंधळ निर्माण होऊन शासनाचा गलथान कारभार उघड झाला. वॉर्ड क्र. 10 चे मतदान कंग्राळी बुद्रुक येथील कन्नड प्रायमरी शाळेमध्ये पार पडले. वॉर्ड क्र. 13 चे मतदान गौंडवाड येथील मराठी प्राथमिक शाळेमध्ये पार पडले.