धाट-उसगांव येथील घटना; पंटेनर वेर्णा येथून ताब्यात
प्रतिनिधी/ फोंडा
धाटवाडा तिस्क-उसगांव येथील एमआरएफ कंपनीजवळ मालवाहू कंटेनर व बुलेट दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. (उत्तमकुमार चंद्रबहादुर धामी 30,मू. नेपाल, रा. सिद्धेsश्वरनगर तिस्क-उसगांव) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात काल बुधवार पहाटे 5.30 वा. सुमारास घडला.
फेंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीचालक आपल्या जीए 05 क्यू 0420 बुलेटने उसगांवहून फोंडय़ाच्या दिशेने येत होता. दाटवाडा उसगांव येथील एमआरएफ कंपनीच्या पार्किगस्थळावर पोचला असता एक मालवाहू कंटेनर आरजे 06 जीबी 6897 रिव्हर्समध्ये वळविण्याच्या पवित्र्यात अचानक रस्त्यावर दाखल झाल्याने हा अपघात घडला. बुलेटची धडक रिव्हर्स मोडमध्ये येणाऱया कंटेनरवर बसली. या धडकेत तो रस्त्यावर फेकला गेला व तिथेच जागीच ठार झाला. पिळय़े धारबांदोडा येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत उत्तमकुमार त्याच्या वडीलांच्या सिद्धेश्वरनगर येथील घरात आपल्या पत्नीसह राहत होता. तर आई-वडील दुसरीकडे राहत असे. त्याला आठ महिन्याचा एक मुलगा असून तो वेर्णा येथील सिप्ला कंपनीत कामाला होता.
फोंडा पोलीस निरीक्षक मोहन गावडेंची सतर्कता
एमआरएफ कंपनीजवळ पहाटे बुलेट दुचाकीच्या स्वयंअपघात युवक ठार अशीच बातमी सर्व सोशलमिडीया पोर्टलवरून चर्चिली जात होती. मात्र फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यानी घटनास्थळावरील निरीक्षणामुळे खरा प्रकार उघडकीस आला. अन्य एक वाहनाचा समावेश असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या दिशेने तपास करण्यात आला. तेव्हाच पलायन केलेल्या कंटेनर चालक व क्लिनर यांना वेर्णा येथून ताब्यात घेण्यात पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली.
अवजड पार्किगची सोय तरीही वाहनचालकांचा निष्काळजीपणा
एमआरएफ कंपनीतर्फे अवजड वाहन पार्किगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरीही वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे असे अपघात घडत आहेत. इथे रात्री अपरात्री वाहनांची वर्दळ कायम असते. वाहनचालक सर्रास वाहने वळवित असतात. यावेळी क्लिनर मालवाहूचे परमिट, कागदपत्रे कंपनीकडे सुपुर्द करण्यासाठी गेलेला असतात व चालक बिनधास्त कुठलीही पर्वा न करता गाडी वळवित असल्यामुळेच अशा घटना घडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी अपघातानंतर घटनास्थळावरून धूम ठोकलेल्या कंटेनरला वेर्णा येथून ताब्यात घेतले आहे. तसेच निष्काळजीपणे वाहन हाकून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालक विजयकुमार बदामसिंग (30,हजारीबाग-झारखंड) व क्लिनर बिरेंद्र दिनेशवर सिंग (20, रामपुर-झारखंड) या दोघां संशयितांवर भा. दं. सं. 279, 304(अ) व मोटरवाहन कायद्याच्या 134 (अ) (ब) कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक सत्यवान गावकर अधिक तपास करीत आहे.