महामार्गावरील देवधेतील घटनेत तरूणी गंभीर
प्रतिनिधी / लांजा
गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱया कंटेनर व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार तर दुचाकीच्या मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील देवधे येथील अमेय ढाब्यानजीक रविवारी दुपारी 2.45 च्या दरम्यान घडली.
……असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर दुचाकीच्या मागे बसलेली मयुरी कांबळे (26) ही तरुणी गंभीर जखमी झाली. तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनरखाली दुचाकी सापडल्याने दुचाकी 200 फूट फरफटत जाऊन दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त कंटेनर (क्रमांक एम. एच.- 48, जे- 530) हा गोव्यावरून मुंबईच्या दिशेने निघाला होता. तर …. हा दुचाकी चालवत होता. तो दुचाकी (क्रमांक एम. एच.-08-वाय-8664) घेऊन लांजाच्या दिशेने जात होता. दरम्यान याचवेळी कंटेनरही देवधे येथील अमेय धाब्यानजीक आला असताना कंटेनर व दुचाकीची समोरासमोर धडक बसली. कंटेनर विरुद्ध दिशेला जात असतानाच दुचाकी कंटेनरच्या मध्यभागी सापडली. यामध्ये दुचाकीचालक महामार्गाच्या मध्यभागी आदळून जागीच ठार झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेली तरुणी महामार्गावर जोरदार आदळली. त्यानंतर तिला तत्काळ प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघाताची माहिती समजताच देवधे येथील तरुणांनी धाव घेऊन अपघातातील गंभीर जखमी असलेल्या तरुणीला उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा करून मृतदेह लांजा रुग्णालयात पाठवला.