@ प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना झाल्यानंतर त्या परिसरामध्ये कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येते. तातडीने बॅरिकेडस् लावण्यात येतात. याचबरोबर घराचे किंवा आस्थापनाचे सॅनिटायझशन केले जाते. मात्र खडेबाजारमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले. त्या ठिकाणी केवळ एकच बॅरिकेडस् लावण्यात आला. त्यामुळे व्यापाऱयांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतूकीच ये-जाही सुरु होती. त्यामुळे खडेबाजार येथील व्यापाऱयांनी खडेबाजार पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. मात्र त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे बोट केले.
कंटेन्मेंट झोनबद्दल सर्वत्रच संभ्रमावस्था निर्माण होत आहे. त्याबाबत असलेले नियम एक सारखे लावण्यात येत नाहीत. काही ठिकाणी 50 मीटरवर तर काही ठिकाणी केवळ ते घर किंवा आस्थापन सीलडाऊन केले जाते. नेमका हा प्रकार काय आहे? त्याबाबत खुलासा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कोरोनाबाबत जे नियम आहेत ते पाळण्याबाबत आम्ही तयार आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन करायचे, त्या ठिकाणचीच व्यक्ती बाहेर फिरायची, असे प्रकार सर्रास सुरु आहे. खडेबाजारमध्ये रुग्ण आढळल्यानंतर बॅरिकेडस् लावण्यात आले. मात्र वाहतूक सुरुच होती. त्यामुळे व्यवसायिकांमध्ये संभ्रमावस्था सुरु झाली. दुकाने सुरु ठेवावीत की बंद ठेवावीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्याबाबत पोलिसांना विचारले असता तुम्हाला तसे कळविण्यात आले आहे का? अशी विचारणा पोलिसांनी केली.
जिल्हा प्रशासनाच्या या प्रकारामुळे सर्वत्रच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 10 टक्के भाग बॅरिकेडस् लावून अडविण्यात आला तर 90 टक्के भाग खुला ठेवण्यात आला. त्यामुळे ही अडवणूक वाहतुकीसाठी की कंटेन्मेंट झोनसाठी? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. मात्र आम्हाला याबाबत कोणतीच माहिती नाही, असे पोलिसांनी सांगितले. याचबरोबर रुग्ण सापडलेल्या आस्थापनाचे सॅनिटायझेशन देखील करण्यात आले नाही. त्यामुळे कंटेन्मेंट झोन हा एक आता फार्स ठरत आहे, अशी चर्चा सुरु आहे.