तत्काळ वेतनाची ‘मॅग्मो’ संघटनेची मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ातील जवळपास 100 तदर्थ वैद्यकीय अधिकाऱयांचे गेल्या 6 महिन्यातील पगारच न झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबामधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे वेतन तत्काळ वेतन अदा करण्याबरोबरच अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅगमो) संघटनेने प्रशासनाला दिले आहे.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान पितळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱयांच्या वेगवेगळ्या मागण्यांविषयी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, आरोग्य सभापती, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. 100 तदर्थ वैद्यकीय अधिकाऱयांचे आर्थिक लाभ गेले 6 महिने देण्यात आलेले नाहीत. लवकरात-लवकर हे लाभ मिळावेत, वैद्यकीय अधिकाऱयांना जिल्हा रूग्णालय व जिल्हा परिषद कार्यालयात सौजन्याची वागणूक मिळावी, योग्य कारणासाठी या अधिकाऱयांना वेळोवेळी रजा देण्यात याव्यात, अशा प्रमुख मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सेवांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रस्ताव वेळेत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात यावेत. हे प्रस्ताव विशिष्ट कालमर्यादेत रवाना झालेच पाहिजेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर देय लाभ वेळीच देण्यात यावेत. अनेकवेळा तोंडी आदेश देऊन कारभार करण्यात येतो. हे टाळले पाहिजे. अपेक्षित कामकाज लेखी आदेशाद्वारे करण्यात यावे असे ‘मॅगमो’ संघटनेने आग्रहपूर्वक नमूद केले आहे.
नवे सरकार येऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून आता प्रलंबित देणी अदा करण्यात यावीत असे संघटनेने म्हटले आहे.