प्रतिनिधी/ म्हापसा
ग्रामीण विकास योजनेंतर्गत गेल्या बारा वर्षापासून अधिक काळ कंत्राट पद्धतीने काम करणाऱया 180 महिला पुरुष कामगारांनी ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांची त्यांच्या निवास्थानी पर्रा येथे भेट घेऊन त्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. दरम्यान राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून याबाबत आपण मुख्यमंत्र्याशी बोलणी करून या 180 कंत्राट पद्धतीवर काम करणाऱयांना सेवेत सामावून घेण्यास स्वतःहून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शिष्टमंडळात सर्वश्री साबाजी शेटय़े, अजय तुब्की, नासरिन शेख, शिवाजी देसाई, कल्पीता देसाई, अमरीश गडकर आदींचा समावेश होता. सुरुवातीला केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कंत्राटी पद्धतीवर कामावर रुजू करून घेतलेल्या या कामगारांची गेली कित्येक वर्षे सेसेहोलपट चालल्याची तक्रार यावेळी शिष्टमंडळाकडून मंत्री मायकल लोबो यांच्यासमोर करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामीण विकास कार्यालयाचा 25 टक्के भार उचलत असलेल्या आपणांसर्वांची अत्यंत तुटपुंज्या पगारावर बोळवण केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान मंत्री मायकल लोबो यांनी शांतपणे कामगारांच्या समस्या ऐकून घेण्याबरोबरच लवकरच त्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भेट घालून देणार असल्याचे त्यांना आश्वासन दिले. त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्यांना राज्य ग्रामीण संस्थेत सामावून घेण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सरकारची आर्थिक स्थिती मंदावलेली असल्याने नवीन नोकर भरतीत वेळकाढू धोरण अवलंबीले जात असल्याचे मंत्री लोबो यांच्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले मात्र कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱयांचा पगार वेळेत केला जाईल यावर आपण कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे आश्वासन मंत्री लोबो यांनी शेवटी कामगारांच्या शिष्टमंडळाला सांगितले.