ऑनलाईन टीम / काबुल :
सप्टेंबरमध्ये विदेशी सैनिकांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबान संघटनेने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, अमेरिकी सैन्य परल्यानंतर तालिबान आणि अफगाण सैन्यात चांगलाच संघर्ष पेटला आहे. शनिवारी रात्री कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर तालिबान्यांनी तीन रॉकेट डागले. त्यामधील दोन रॉकेट धावपट्टीवर पडले. या हल्ल्यामुळे कंदहार विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे विमानतळप्रमुख मसूद पश्तून यांनी सांगितले.
कट्टरतावादी इस्लामिक गटाने अफगाणिस्तानचा जवळपास अर्धा भाग काबीज केला आहे. पूर्वी कंदाहार हेच तालिबानचे मुख्यालय होते. त्यामुळेच तालिबान्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. तालिबानचे सैनिक कंदाहार बरोबरच हेरात आणि लष्कर गाह या शहरांमध्ये घुसले असून, तिथे अफगाण सैन्याबरोबर धुमश्चक्री सुरू आहे.