मुंबईत घेतले ताब्यात, सोमवारपर्यंत कोठडी
चिपळूण
टी. व्ही. एस. फायनान्स क्रेडीट सर्व्हिसेस कंपनीच्या चिपळूण शाखेमध्ये sफिल्ड कलेक्शन एक्झीक्युटिव्हचे काम करणाऱया एका तरुणाने 8 लाखाची रक्कम हडप केली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 2019पासून गायब झाला होता. वर्षभरानंतर शुक्रवारी त्याला मुंबईतून मोठय़ा शिताफीने अटक करण्यात आली.
रुपेश प्रकाश चांदे (35, मुसाड-खेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदे याने 1 मे ते 23 नोव्हेंबर 2019 या मुदतीत टी.व्ही.एस. फायनान्स क्रेडीट सर्व्हिसेस कंपनीच्या चिपळूण शाखेत फिल्ड कलेक्शन एक्झीक्युटिव्ह पदावर काम करत असताना 35 कर्जदारांकडून 8 लाख 5 हजार 422 रुपये वसूल करुन ती कंपनीमध्ये भरणा न करता परस्पर वापरली होती. कर्जदार व कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात 31 डिसेंबर 2019 रोजी कंपनीचे व्यवस्थापक दीपक मोहन आवले यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार रुपेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो गायब झाला होता.
पोलिसांनी त्याचा वेळोवेळी शोध घेतला, मात्र तो सापडत नव्हता. त्याच्या संपर्कात असणाऱया एका व्यक्तीच्या तांत्रिक बाबी तपासताना रुपेश हा मुंबई हायकोर्ट परिसरात एका कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष शिंदे, पोलीस शिपाई प्रमोद कदम मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या पथकाने गुरुवारी हायकोर्ट परिसरात सापळा रचला. त्यात रुपेश सापडला. न्यायालयात त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक समद बेग, महिला पोलीस नाईक आदिती जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आशिष भालेकर व पंकज पडेलकर यांनी प्रयत्न केले.