क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
येथील कंप्लिट डू कराटे अकादमी कर्नाटक येथे घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते बेल्ट प्रदान करण्यात आले.
सरस्वतीनगर येथील कंप्लीट कराटे सेंटरच्या सभागृहात उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूंसाठी बक्षीस वितरण आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता राज पुरोहित, ज्येष्ट शिक्षक रमेश अलगुडगेकर, डॉ. अमित जडे, कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर आदी मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राजपुरोहित म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत मुला-मुलींनी स्वसंरक्षणासाठी स्वतःला सज्ज करणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी कराटे, ज्युडोचे प्रशिक्षण घ्यावे आणि आत्मरक्षणासाठी त्याचा उपयोग करावा तसेच इतरांनी त्याबद्दल मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कराटेपटू, पालकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.