बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील विविध भागात रस्त्या शेजारी कचरा टाकण्यात येत असल्याने दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. एका ट्रकमध्ये मोठय़ाप्रमाणात कचरा भरून वैभवनगर परिसरातील कचराकुंडीत रिकामी करण्यात येत होता. याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांना मिळताच सदर ट्रक ताब्यात घेऊन 15 हजारचा दंड वसुल करण्यात आला.
कचराकुंडीमध्ये तसेच खुल्या जागा आणि रस्त्या शेजारी कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. रस्त्या शेजारी आणि खुल्या जागांवर कचरा टाकु नये असे आवाहन सातत्याने करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. काही ठिकाणी हॉटेल मधील व इतर कचरा टाकण्यात येत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. अशाचप्रकारे एका ट्रकमधील कचरा वैभवनगर येथील कचराकुंडित शुक्रवारी दुपारी टाकताना निदर्शनास आले. त्यामुळे ही माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांना देण्यात आली. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱयांनी धाव घेऊन सदर ट्रक ताब्यात घेतला. तसेच कचरा टाकल्या प्रकरणी 15 हजारचा दंड देण्याची सूचना ट्रक चालकाला करण्यात आली व सदर रक्कम वसुल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.