कुजलेल्या मांसाच्या दुर्गंधीमुळे तुरमुरीतील नागरिकांनी कंटेनर अडविला
वार्ताहर/ उचगाव
तुरमुरी कचरा डेपोकडे कचरा नेणाऱया कंटेनरमधून सुटलेल्या दुर्गंधीने नागरिक आक्रमक होऊन त्यांनी कंटेनरच बेळगावला माघारी धाडल्याची घटना शनिवारी घडली. शनिवारी सकाळी तुरमुरी गावच्या बस स्थानकाजवळ रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी नागरिक जमले होते. याचवेळी बेळगाव महापालिकेचा कचरा वाहतूक करणारा कंटेनर तुरमुरी कचरा डेपोकडे जात होता. यावेळी सुटलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांनी कंटेनर अडविला असता त्यात जनावरांचे कुजलेले मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या तुरमुरीतील काही नागरिकांनी चालकाला सदर कंटेनर बेळगावाला माघारी नेण्यास भाग पाडले. यावेळी दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी चक्क नाकाला रुमाल धरला होता. कचरा डेपोमुळे या भागातील नागरिकांना जीवन जगणे कठीण बनले आहे. मात्र यासंदर्भात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
नागरिक आक्रमक बनल्याने सदर कंटेनर पुन्हा बेळगावला नेण्यात आला. कचरा डेपोबाबत ठोस निर्णय न घेतल्यास कचरा वाहतूक करणारी सर्व वाहने अडविण्यात येतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.