प्रतिनिधी / देवगड:
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या घंटागाडीच्या माध्यमातून दर दिवशी शहरातून एक टन कचरा गोळा केला जातो. सुका कचरा व ओला कचरा प्रत्येकी सुमारे 500 किलो गोळा होतो. सुक्या कचऱयामध्ये त्यात प्लास्टिक, पुठ्ठा, लोखंड, रद्दी आदींचा समावेश असतो. तर ओल्या कचऱयामध्ये खरकटे अन्न इत्यादींचा समावेश असतो. ओला कचरा नगरपंचायतीने उभारलेल्या खत प्रकल्पामध्ये दिला जातो. कचऱयाच्या माध्यमातून नगरपंचायतीला भंगार विक्री व खत विक्रीतून गेल्या सहा महिन्यामध्ये 94 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर देवगड जामसंडे शहरामध्ये घरोघरी कचरा संकलन करून शहर स्वच्छता करण्यास सुरुवात झाली. नगरपंचायतीने कचरा संकलनासाठी घंटागाडय़ा घेतल्या असून प्रत्येक प्रभागातून कचरा संकलन केला जात आहे. कचरा घेताना ओला व सूका कचरा वेगवेगळा घेतला जातो. त्यामुळे देवगड शहरात कुठेही कचरा कुंडय़ा दिसत नसून शहर स्वच्छ दिसत आहे. नगरपंचायतीने स्वच्छता अभियानातही पहिला क्रमांक मिळविलेला आहे. घंटागाडय़ांच्या माध्यमातून संकलन केलेल्या कचऱयाचे वर्गीकरण केले जाते. प्लास्टीक, लोखंड, पुठ्ठा भंगाराला दिले जाते. ओला कचरा खत प्रकल्पाला दिला जातो. तसेच गांडूळखतासाठीही ओला कचरा दिला जातो. ओल्या कचऱयापासून सुमारे 50 टन खत निर्मिती करण्यात आली आहे. 10 रुपये प्रति किलो याप्रमाणे आंबा बागायतदार व शेतकऱयांना खत विक्री केले जाते. खतविक्रीतून नगरपंचायतीला गेल्या सहा महिन्यात 74 हजार 810 रुपये उत्पन्न मिळाले आहे. सुक्या कचऱयाच्या माध्यमातून भंगार विक्रीतून 19 हजार 192 रुपये उत्पन्न मिळाले आहे. नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर यांनी सांगितले की, देवगड-जामसंडे शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी नगरपंचायत सातत्याने प्रयत्न करीत आहेत. कुणीही उघडय़ावर कचरा टाकू नये यासाठी प्रत्येकाच्या दारात घंटागाडी जाऊन कचरा गोळा करते. ओल्या कचऱयावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. यातून नगरपंचायतीला उत्पन्न मिळत आहे. यापुढे स्वच्छतेसाठी विविध उपक्रम नगरपंचायत राबविणार आहे, असेही त्या म्हणाल्या.