वित्त आयोगाकडून प्राप्त निधीतून खरेदी
प्रतिनिधी/ पणजी
रोज 45 ते 55 टन कचरा निर्माण होणाऱया पणजी महानगरपालिकेला ओला, सुका, असा विविध प्रकारचा कचरा वाहतूक करण्यासाठी अत्याधुनिक ट्रक आणि यंत्रणा प्राप्त झाली आहे. चौदाव्या वित्त आयोगाकडून मंजूर झालेल्या निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यावर सुमारे 2 कोटी 70 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
कचरा वाहतुकीसाठी पाच ट्रक, एक जेसीबी, पाण्याचे टँकर, कॉम्पेक्टर प्राप्त झाला आहे. उर्वरित वाहने टप्प्याटप्प्याने येणार आहेत, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली आहे. पैकी पाच ट्रकांच्या खरेदीसाठी 81 लाख रुपये, जेसीबीसाठी 27 लाख तर दोन टँकरसाठी 42 लाख रुपये देण्यात आले आहेत.
राजधानीत रोज 45 ते 55 टन कचऱयाची निर्मिती होते. विविध सण सोहळ्यांच्या काळात या कचऱयात वाढ होते. त्यात ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या, टय़ुबलाईटस्, बल्ब, पुठ्ठे, कागद यांचा समावेश असतो. नाताळ, नववर्ष या काळात राज्यात मोठय़ा प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक येतात, त्यामुळे कचऱयाचे प्रमाण वाढत जाते. यातील सुमारे 10 टन ओला कचरा साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठविला जातो. प्लास्टिक बाटल्यांचे बेलिंग करून हा कचरा कर्नाटकातील सिमेंट कंपनीला पाठविण्यात येतो. उर्वरित ओल्या कचऱयाची प्रक्रिया शहरातील विविध भागात असलेले प्रकल्प व कंपोस्टिंग केंद्रांमध्ये करण्यात येते. करंजाळे येथे बायो डायजेस्टर प्रकल्प उभारण्यात आला आहेत. त्याच धर्तीवर शहरात अन्य सुमारे 17 ठिकाणी मिनी बायो डायजेस्टर प्रकल्प उभारण्यात येत आहेत.