वृत्तसंस्था/ अल्माटी
मध्य आशियाई देश कजाकस्तानात गॅसच्या वाढत्या किमतींमुळे भडकलेल्या जनतेच्या हिंसक निदर्शनांमुळे पंतप्रधान अस्कार मामिन यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती कासम झोमार्ट टोकायेव्ह यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. याचदरम्यान राष्ट्रपतींकडून देशातील सर्वात मोठे शहर अल्माटी अणि मानगिस्ताउ प्रांतात दोन आठवडय़ांसाठी आणीबाणी लागू केली आहे.
या आणीबाणी अंतर्गत रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर लोकांच्या एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सरकार आणि सेन्यावर हल्ल्यासाठी आवाहन करणे पूर्णपणे अवैध आहे. परस्पर विश्वास अन् संवाद निर्माण व्हावा असे राष्ट्रपतींनी स्वतःच्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
राष्ट्रपतींच्या संदेशावेळी अल्माटीमध्ये पोलीस निदर्शकांवर अश्रूधूराचा मारा तसेच ग्रेनेड डागत होते. हजारोंच्या संख्येत उपस्थित निदर्शक महापौरांच्या कार्यालयात शिरू नयेत याकरता पोलिसांकडून प्रयत्न सुरू होता. तेलसमृद्ध या देशात सरकारने मंगळवारी रात्री एलपीजीचे दर पूर्वीप्रमाणे करण्यात आल्याची घोषणा केली आहे. तर तत्पूर्वी नववर्षात एलपीजीच्या किमतींमध्ये वृद्धी झाल्याने निदर्शक अल्माटी शहरात पोहोचले होते.
काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त
या निदर्शनानंतर पंतप्रधानांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपतींनी घटनेचे कलम 70 अंतर्गत स्वीकारला आहे. अल्माटी हे शहर कजाकस्तानची आर्थिक राजधानी असून तेथे मंगळवारी रात्री स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. अस्कार मामिन यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींनी समैलोव्ह अलिखान यांना देशाचा काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे. वर्तमान सरकारचे सदस्य नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत स्वतःचे काम करत राहतील असे या आदेशात म्हटले गेले आहे.