आर.स्नेहित एकेरीच्या अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कझाकस्तानमधील करगंदा येथील आयटीटीएफ कझाकस्तान आंतरराष्ट्रीय खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या सिद्धेश पांडे-मुदित दाणी आणि फिडेल आर. स्नेहित-सुधांशू ग्रोव्हर या भारतीय जोडय़ांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला दुहेरीत भारतीय जोडीने तसेच पुरुष एकेरीत स्नेहितने अंतिम फेरी गाठली आहे
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार प्रदर्शन केले. मात्र उपांत्य फेरीत पुरुष दुहेरीच्या जोडय़ांना पराभवाला सामोरे जावे लागले. मुदित व सिद्धेश या महाराष्ट्राच्या जोडीला सौदी अरेबियाच्या अली अलखद्रावी-अब्दुलअझिझ बु शुलायबी यांच्याकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. स्नेहित-सुधांशू यांनी पराभव स्वीकारला असला तर त्यांनी जोरदार संघर्ष केला. कझाकच्या ऍलन कुर्मंगालियेव्ह-किरिल गेरासिमेन्को यांच्याकडून 3-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला.
स्नेहितने एकेरीतही अंतिम फेरी गाठली असून त्याने उपांत्य फेरीत बेलारुसच्या पॅव्हेल प्लाटोनोव्हवर 4-1 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 405 क्रमांकावर असणाऱया स्नेहितची जेतेपदाची लढत किरिल गेरासिमेन्कोशी होणार आहे. महिलांच्या दुहेरीत भारताच्या कौशनी नाथ व प्राप्ती सेन यांनीही अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी उपांत्य फेरीत उझ्बेकच्या कामिला खलिकोव्हा-मेखरिनिसो नॉर्पुलोव्हा यांना 3-1 असे पराभूत केले. जेतेपदासाठी त्यांची लढत रशियाच्या व्हॅलेरिया कोत्सियुर-व्हॅलेरिया शचेर्बातिख यांच्याशी होणार आहे.