ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात हेरगिरी करणारे पाकिस्तानचे ड्रोन १९ बटालियनच्या बीएसएफ जवानांनी आज पहाटे गोळीबार करत पाडले. या पाकिस्तानी ड्रोनमध्ये एक अत्याधुनिक रायफल, दोन मॅगझीन, ६० राउंड आणि सात ग्रेनेड होते, अशी माहिती बीएसएफ जवनांकडून देण्यात आली.
कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील रथुआ भागात आज पहाटे ५.१० वाजता बीएसएफच्या सीमा चौकीच्या पानसरजवळ एक पाकिस्तानी गुप्तचर ड्रोन उडताना दिसले. ड्रोनचा मागोवा घेतला असता हे ड्रोन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे असल्याचे समजले. त्यावेळी उपनिरीक्षक देवेंदरसिंह यांनी त्यावर नऊ एमएम बॅरेटच्या आठ राउंड गोळ्या झाडल्या आणि हे ड्रोन खाली पाडले.
भारतीय सीमारेषेवरील हलचाली टिपण्यासाठी पाकिस्तानकडून या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. ड्रोन पाडलेले ठिकाण पाकिस्तान सीमेपासून अंदाजे 250 मीटर दूर होते.