स्कॉटलंड येथून सांगतायेत सचिन, नमिता बांदेकर मूळ म्हापण येथील रहिवासी : ग्लासगो शहरात आयटी क्षेत्रात कार्यरत : ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना : सर्वच कार्यालये बंद : कोरोनावर चांगले नियंत्रण
प्रमोद ठाकुर / कुडाळ
मोठमोठय़ा आय. टी. कंपन्या असलेल्या स्कॉटलंडमध्ये लॉकडाऊनचे कडकपणे पालन करण्यात आले. त्यामुळे तेथे कोरोनाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला नाही. ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचना देऊन जवळ-जवळ सर्वच कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. स्कॉटलंडमध्ये कोरोनावर चांगले नियंत्रण मिळवता आले, असे मूळ म्हापण येथील रहिवासी व सध्या स्कॉटलंड येथील ग्लासगो शहरात आय. टी. क्षेत्रात प्रोजेक्ट प्रमुख म्हणून काम करणारे सचिन तुळशीदास बांदेकर व त्यांची पत्नी नमिता बांदेकर यांनी सांगितले.
सचिन बांदेकर हे 2016 पासून स्कॉटलंडमध्ये आय. टी. क्षेत्रात करिअर करीत आहेत. पाट हायस्कूलचे सेवानिवृत्त लिपीक तुळशीदास उर्फ विलास बांदेकर यांचा तो मुलगा. नमिता या मूळच्या देवगडच्या नमिता रघुनाथ कोरगावकर. त्यांचे वास्तव्य मुंबई येथे होते. विवाहानंतर 2018 मध्ये त्या स्कॉटलंडला गेल्या. आय. टी. कंपनीत त्या सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतात.
स्कॉटलंडमध्ये लॉकडाऊन गांभीर्याने केले जाते. त्यामुळे आपण आठवडय़ातून एकदाच सामान आणण्यासाठी बाहेर पडतो, असे सचिन म्हणाला. मास्क लावण्यासाठी सक्ती नाही. मात्र, सोशल डिस्टन्सिंग सर्वत्र कडक पाळले जाते. आपण राहत असलेल्या ग्लासगो शहरात मोठय़ा प्रमाणावर आय. टी. क्षेत्र आहे. मात्र, सर्व कार्यालये बंद असून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचना असल्याने शहर ओस पडल्यासारखी स्थिती आहे.
गणपतीला यायची संधी हुकणार
यावर्षी गणपतीला येण्याचे नियोजन होते. एप्रिलमध्ये तिकीट बुक करायचे होते. मात्र, आता विमानसेवा बंद असल्याने व ती परत कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याने यावर्षी गणपतीला यायची संधी हुकली, असे सचिन सांगत होता.
गर्दी करण्यास मनाई
गेला महिनाभर ‘वर्क फ्रॉम होम’, असे काम सुरू असून कंपनीने आपणास पूर्ण सहकार्य केल्याचे सौ. नमिता म्हणाल्या. सुरुवातीला लोकांनी मोठी खरेदी केल्याने टंचाई भासली. मात्र, आता सुपर मार्केटमध्ये सर्व वस्तू मिळतात, असे त्या म्हणाल्या. तरुणांनी सुपर मार्केटमध्ये खरेदी करा. वृद्धांना ऑनलाईन वस्तू मागविण्याची सेवा देण्यास सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट सर्व बंद आहेत. लोकांनी गर्दी करू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे निर्बंध असून पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. सुरुवातीपेक्षा आता मात्र धोका कमी असल्याची भावना निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या.