वार्ताहर / पाटगाव
कडगाव ता.भुदरगड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दीपाली पांडुरंग देसाई यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपक कांबळे होते. मावळते उपसरपंच सुभाष सोनार यांनी आघाडीच्या वतीने ठरलेला कालावधी संपल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. कडगाव ग्रामपंचायतीवर माजी सभापती धनाजीराव देसाई यांच्या केदारलिंग ग्राम विकास आघाडीची सत्ता आहे.
निवडीनंतर झालेल्या सत्कार सभारंभात बोलताना माजी सभापती धनाजीराव देसाई यांनी कडगाव ग्रामपंचायत मध्ये पदे भूषवलेल्या व्यक्ती या राजकारणा बरोबरच समाजकारणात ही नेहमी अग्रेसर राहिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी राजकारणा पेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन गावाचा सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत रहावे असे सांगितले व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गावात राबवलेल्या आदर्श आचारसंहिते बद्धल ही अभिनंदन केले. या वेळी माजी सरपंच शिवाजीराव देसाई, महादेव दबडे, दत्तात्रय देसाई अण्णा, ग्रामपंचायत सदस्य शहाजी देसाई, सुभाष सोनार, दिगंबर गुरव, संजय चव्हाण, रुपाली मांगले, विमल शिंदे, शैलजा सातोसे, पांडुरंग देसाई, अजित मांगले उपस्थित होते.