प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; तस्कर मोकाट, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
देवराष्ट्रे / प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यात अवैध गौण खनिजाची वाहतुक जोमात सुरू आहे. वाळू, मुरूम, रेतीची भरदिवसा वाहतुक होत आहे. वाळूतस्करांवर जुजबी कारवाई करुन प्रशासन बड्या तस्करांना मोकाट सोडत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमेतवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
कडेगाव तालुक्यात येरळा व नांदणी या दोन नद्या आहेत. हंगामी वाहणाऱ्या या नद्यामध्ये मुबलक प्रमाणात वाळू असून या वाळूस मोठी मागणी आहे. त्यामुळे तालुक्यात या दोन नद्यांमधुन मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असते. तालुक्यातील अनेक गावे या वाळू चोरीसाठी प्रसिद्ध आहेत. या व्यवसायात बडे तस्कर आहेत. सायंकाळपासुन पहाटेपर्यंत नद्यांना ओरबडण्याचे काम या तस्करांकडून सुरू असते. यासाठी जेसीबी, टॅक्टर, डंपर, टेम्पो आदी वाहनांचा वापर करण्यात येतो. याचबरोबर तालुक्यात मुरूम, मातीचीही अवैध वाहतूक जोमात सुरू असते. प्रशासन तस्करांना वर्षानुवर्षे पाठीशी घालत आहे. यामुळे तस्कर कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे तालुक्यात शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या तस्करांवर कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
प्रशासनास मदत करणाऱ्या नागरिकांची तस्करांना टिप
तालुक्यातील काही सुजाण नागरिक बेकायदा गौण खनिज वाहतुक सुरू असल्यास प्रशासनास माहिती देतात. एकप्रकारे हे नागरिक प्रशासनास मदत करतात. परंतु संबंधित नागरिकाची माहिती लगेच तस्करांना दिली जाते . ही माहिती तस्करांना कोण पुरवते याचा शोध लागण्याची गरज असून प्रशासनातीलच काही लोक संबंधित तस्करांना ही माहिती देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशीही मागणी नागरिक करत आहेत.