प्रतिनिधी / कडेगाव
साळसिंगे (ता. खानापूर) येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द (ता.कडेगाव) येथील दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली. शुक्रवारी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासनाने अलर्ट होते संपूर्ण गाव सील केले होते. तर १४ जनांना कडेगाव येथे संस्थात्मक क्वारंनटाईन केले होते. आज यातील तिघांचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने कोरोना साखळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तालुका हदरला असून भितीचे वातावरण आहे.
भिकवडी गावात एकूण चार रुग्न सापडल्याने प्रांताधिकारी डॉ.गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे, निरीक्षक विपीन हसबनिस यांचेसह आरोग्य विभाग व तालुका प्रशासन भिकवडी खुर्द गावात तळ ठोकून आहे. संबंधित वस्ती व भिकवडी खुर्द हे गाव सील केले असून गावांत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. तर आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने गावात निर्जंतुक औषध फवारणी सुरु केली आहे.