वार्ताहर/ कडोली
शुक्रवारी मध्यरात्री एका शेडला आग लागून शेडमधील दोन दुचाकी वाहने, शेती अवजारांसह आगीत भस्मसात होऊन सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना कडोली येथे घडली.
अधिक माहिती अशी की, येथील सावकार गल्लीतील रहिवासी अनिल रावजी पाटील यांच्या मालकीच्या परसातील शेडला मध्यरात्री 1 वाजता आग लागून संपूर्ण शेड जळून खाक झाले. या शेडमध्ये ठेवण्यात आलेले एम80 आणि हिरो होंडा या दोन्ही दुचाकी आगीत भस्मसात झाल्या. शिवाय शेती अवजारांसह 10 पोती रासायनिक खत जळून गेले. आगीचे कारण समजू शकले नसून घटनास्थळी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने मदत करावी. या घटनेची काकती पोलिसांत नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.