वार्ताहर/ कडोली
छत्तीसावे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 10 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद नगरी येथील छत्रुमहाराज भवन, पॉलिफ्लो पॉलिहैड्रॉन पुरस्कृत बसवाण्णा नगर येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अशोका कन्स्ट्रक्शनचे अशोक नाईक यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून माधुरी शानभाग उपस्थित राहणार आहेत.
माधुरी शानभाग या जीएसएस कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. प्राचार्यपद भूषवून त्या निवृत्त झाल्या. पळसाची पाने, काचकमळ, चकवा, चेहरे यासह अनेक कथासंग्रह, 7 हून अधिक कादंबऱया, चरित्र लेखन शिवाय बालसाहित्यही त्यांनी लिहिले आहे.
लेखनाबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्याचे दोन पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचे तीन पुरस्कार, सर्वेत्कृष्ट कथा लेखिका पुरस्कार, उत्कृष्ट कथा पुरस्कार, वि. दा. सावरकर पुरस्कार, डॉ. कुमुद बन्सल पुरस्कार मिळाले आहेत.
अशोक नाईक यांचा बेळगावमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी संबंध असून त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले आहेत. आदेश बांदेकर, श्रेया घोशाल यांना बेळगावला आणण्यात त्यांचा पुढाकार होता. अनेक सिने-नाटय़ कलाकारांना बेळगावमध्ये निमंत्रित करून ते रसिकांसाठी कार्यक्रम आयोजित करतात. विविध साहित्य संमेलनांशी ते सलग्न आहेत. लॅन्ड डेव्हलपर व बिल्डर म्हणून ते परिचित आहेत.