वार्ताहर/ कडोली
येथील मराठी साहित्य संघाच्यावतीने 36 वे कडोली मराठी साहित्य संमेलन दि. 10 जानेवारी रोजी साधेपणाने आयोजित करण्याचा निर्णय साहित्य संघाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडवाडकर होते.
बैठकीच्या प्रारंभी लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि कडोली मराठी साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक कै. अशोक याळगी यांना संघाच्यावतीने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाचे मराठी साहित्य संमेलन कार्यालयाच्या सभागृहात मास्क, सॅनिटायझरसह सर्व नियमांचे पालन करून संमेलन पार पडणार आहे. शाळकरी मुलांच्या गैरहजेरीत साधेपणाने ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. संमेलनात उद्घाटन सत्र, कवी संमेलन आणि एखादे सांस्कृतिक सत्राचे आयोजन करण्याचे ठरले. शिवाय यावेळी वनभोजनालाही फाटा देण्यात आला आहे. या संमेलनाला स्थानिक पातळीवरील साहित्यिकांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला बसवंत शहापूरकर, शिवाजी कुट्रे, भरमाण्णा डोंगरे, संभाजी पवार, सुधीर कुट्रे, राजू पाटील, यल्लाप्पा पावले, दीपक होनगेकर, किशोर पाटील, संभाजी होनगेकर, जीवन भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.