सुदैवानेच मोठा अनर्थ टळला : महामार्ग ठेकेदार कंपनीचे निकृष्ट काम पुन्हा उघड : कणकवलीवासीयांतून तीव्र संताप
सर्व्हिस रोड बंद असल्याने हानी टळली स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आल्याशिवाय काम नको!
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरातील हायवेच्या निकृष्ट कामाची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी 10.20 च्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्य़ाकडील फ्लाय ओव्हरब्रिजच्या वरील भागात काँक्रिट घालत असताना स्लॅबचा हा भागच कोसळला. सुदैवाने काम सुरू असल्याने या ठिकाणचा सर्व्हिस रोड बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी दुपारी या कोसळलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी, जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल येत नाही, तोपर्यंत शहरात कुठेच हायवेचे काम सुरू राहता नये. जो भाग कोसळला, तेथील पिलरवरील सर्व भाग काढून नव्याने करा. ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगत ठेकेदार कंपनीच्या साईट इंजिनिअरला खडसावले.
पंधरा दिवसांपूर्वी कोसळलेला बॉक्सेलचा भाग
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरण कामाबाबत अनेक तक्रारी समोर येत असतानाच 13 जुलै रोजी शहरातील एस. एम. हायस्कूलसमोरील बॉक्सेल ब्रिजच्या भिंतीचा काही भाग कोसळून रस्त्यावर आला होता. त्यानंतर नेते, अधिकारी यांचे या कोसळलेल्या भागाचे दौरे झाले. कामाची चौकशी झाली. मात्र यातून अद्याप ठोस काहीच निष्पन्न झालेले नाही.
सकाळपासून काँक्रिटचे काम सुरू
शहरातील छ. शिवाजी महाराज पुतळ्य़ाकडील फ्लाय ओव्हरब्रिजच्या काही भागाचे स्लॅब घालण्याचे काम काँक्रिटच्या मशिनरीद्वारे सकाळपासून दिलीप बिल्डकॉनकडून हाती घेण्यात आले होते. या कामासाठी तायशेटे हॉस्पिटलच्या काही भाग पुढे ते पुतळ्य़ापर्यंतचा सर्व्हिस रस्ता बंद करण्यात आला होता.
अचानक स्लॅबचा भाग कोसळला
सकाळी 9 च्या सुमारास सर्व्हिस रस्ता बंद केल्यानंतर फ्लाय ओव्हर ब्रिजच्या पडदीसारख्या भागात काँक्रिट घालण्याचे काम सुरू होते. पुतळ्य़ापासूनच्या काही भागात काँक्रिट घालून पुढे सरकत असतानाच अचानक भार वाढल्याने या काँक्रिटसह पत्र्याच्या प्लेट व त्या खाली लावण्यात आलेले लोखंडी सपोर्ट कोसळून खाली पडले. तर त्या पडदीसाठी फ्लाय ओव्हरब्रिजच्या काँक्रिटमध्ये घालण्यात आलेल्या लोखंडी सळ्य़ा वाकल्या होत्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने तेथील नागरिकांची एकच धावपळ उडाली. तेथील मटण शॉपवरील ग्राहकांनीही या घटनेमुळे घाबरून तेथून पळ काढला.
सपोर्ट हलल्याने भाग कोसळला
फ्लाय ओव्हरब्रिजचा हा भाग कोसळला, तेव्हा सुदैवाने तेथील रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर ज्या ठिकाणी स्लॅब घालण्यात येत होते. त्या फ्लाय ओव्हरब्रिजच्या वरील भागात ठेकेदार कंपनीचे कामगार होते. जेव्हा ब्रिजचा भाग कोसळला, तेव्हा त्या कामगारांनी तेथून पळ काढला. फ्लाय ओव्हरब्रिजच्या पडदीच्या ठिकाणी जेथे स्लॅब घालण्यात येत होते, त्याच्या खालील भागात लोखंडी सपोर्ट लावण्यात आले होते. मात्र, स्लॅब घालण्यास सुरुवात करण्यापूर्वी हे सपोर्ट सुस्थितीत आहेत का? याची पाहणी करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. बहुदा त्यामुळेच स्लॅब घातल्याने सपोर्टच्या वरील भागात वजन वाढल्याने हा भाग कोसळल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
बोगस युनिव्हर्सिटी आहे का?
दरम्यान, खासदार राऊत यांनी शुक्रवारी दुपारी पाहणी करत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱयांना खडसावले. स्ट्रक्चर ऑडिटचा अहवाल येत नाही, तोपर्यंत काम करू नये, अशा सूचना असतानाही ठेकेदार काम कसे सुरू करतो? हा बेजबाबदारपणा आहे. ठेकेदाराला निकृष्ट कामाबाबत नोटीस देण्यात आली आहे. मग काम कसे सुरू झाले, असा सवाल राऊत यांनी आरटी फॅक्ट कंपनीच्या एन. पी. सिंग यांना करत धारेवर धरले. काम सुरू असताना येथे असलेल्या साईट इंजिनिअरिंगचे कामावर लक्ष नव्हते का? असा सवाल राऊत यांनी केला. ठेकेदार कंपनीचे साईट इंजिनिअर कपीलकुमार शर्मा यांनी, ‘काँक्रिट घालण्यात येत होते, तेथे पहाटे 4 वाजता कंटेनरने धडक दिली. त्यामुळे सपोर्ट हलल्याने तो भाग कोसळला’, असे सांगितले. जर कंटेनरची धडक बसली, मग काम केले कसे? तुमचे इंजिनिअरिंग कुठे झाले? ती बोगस युनिव्हर्सिटी आहे का? असा सवाल राऊत यांनी करत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱयांना खडसावले.
तोपर्यंत पूर्ण काम थांबवा!
फ्लाय ओव्हरब्रिजचा भाग कोसळल्याने ते स्टील डॅमेज झाले आहे. त्यामुळे हा संपूर्ण भाग काढून नव्याने करण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या. महिन्यापूर्वी या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी पिलरवरील स्लॅब घालण्यात आल्याचे ठेकेदार कंपनीच्या प्रदीपकुमार शर्मा यांनी सांगितले. ‘मला तुमच्याकडून सारवासारव नको. शहरात जो हायवेचा धोकादायक भाग आहे, तो तात्काळ काढा. कोसळलेली गटारे पूर्णपणे नव्याने बांधा. फ्लाय ओव्हरचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय काम सुरू करू नका’, अशा सूचना राऊत यांनी दिल्या. याबाबत पाहणी करण्यासाठी अधीक्षक अभियंता नवले यांना सोमवारी बोलविण्यात आले आहे. त्यांच्यासोबत फ्लाय ओव्हरच्या कामाची पुन:पाहणी करण्यात येणार आहे. जनतेच्या जीवितास धोका असणारे, असे बोगस काम चालणार नाही. या कामाची केंद्र सरकारच्या टिमकडून पाहणी करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. ज्या भागात काँक्रिट घालण्यात येत होते, तो भाग 200 एमएम जाडीचा करायचा होता, असे शर्मा यांनी सांगितले. मात्र, इतर ठिकाणी ही जाडी मेंन्टेन करण्यात आली नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला.
अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून पाहणी
घटनेची माहिती मिळताच सकाळी तहसीलदार आर. जे. पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, नगरसेवक बंडू हर्णे, अबिद नाईक, संजय कामतेकर, मिलिंद मेस्त्राr, बाळू मेस्त्राr, अशोक करंबेळकर, दया मेस्त्राr, सुजीत जाधव, अनिस नाईक, उमेश वाळके, प्रदीप मांजरेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत कोसळलेल्या भागाची पाहणी केली. राऊत यांच्यासोबत रुची राऊत, सचिन सावंत, राजू राठोड, मंगेश लोके, रुपेश नार्वेकर, वैभव काणेकर, बंडू पारकर, प्रसन्ना देसाई, बाळू पारकर, रिमेश चव्हाण, ठेकेदार कंपनीचे प्रदीपकुमार शर्मा, उदयवीर चौधरी, कपीलकुमार शर्मा, आर. बी. परिहार, आरटी फॅक्टचे एन. पी. सिंग आदी उपस्थित होते.
शहरातील कामाला कुणी वालीच नाही
आम्हाला कणकवली शहरात फ्लाय ओव्हरब्रिज नकोच. त्याऐवजी कणकवलीतून पूर्वी होता, त्याचप्रमाणे महामार्गाचे काम करा, अशी मागणी रुपेश नार्वेकर यांच्यासह काही नागरिकांनी केली. ठेकेदार कंपनीकडून शहरात हायवेचे निकृष्ट काम करण्यात येत असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी कुणी वालीच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. शहरातील हायवेच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी यापूर्वी वारंवार करण्यात आली होती. मात्र, ते न करताच हायवेचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. याबाबत आवाज उठविला, की ठेकेदार कंपनी पोलीस बंदोबस्तात काम सुरू ठेवते. अशाप्रकारे वाहतूक सुरू होण्याच्या पूर्वीच काम कोसळत असेल, तर हा कणकवलीकरांच्या व प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न आहे. यात आता दबाव खपवून घेणार नसल्याचा इशारा नलावडे यांनी अधिकाऱयांना दिला.
कंटेनरची धडक यापूर्वीची?
हायवे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱयांकडून फ्लाय ओव्हरब्रिज खालील लावण्यात आलेल्या सपोर्टला शुक्रवारी पहाटे 4 वाजता कंटेनर धडकल्याचा दावा करण्यात आला. त्या धडकेमुळे सपोर्ट हलले. मात्र आम्हाला पहाटे माहिती मिळाल्यावर सकाळी ज्या ठिकाणचा भाग हलला होता, तेथे वेल्डिंग करून डागडुजी करण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले. मात्र, आठ दिवसांपूर्वी कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी लावलेल्या पत्र्यांना कंटेनर घासला होता. शुक्रवारी असा प्रकार घडला नाही. ठेकेदार कंपनी आता वेळ मारून नेण्यासाठी खोटे सांगत असल्याचा आरोप प्रसन्ना देसाई यांनी केला. त्यावर याबाबत पक्की माहिती घ्या व मला कळवा. ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा राऊत यांनी दिला.