रोख 20 हजारासह दोन लाखाचा ऐवज लंपास : तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद
कणकवली:
कणकवली शहर परिसरात पुन्हा एकदा चोऱया, घर, दुकानफोडय़ांचे ग्रहण लागले आहे. मंगळवारी भल्या पहाटे 4 वा. थेट महामार्गालगतच असलेला पीटर इंग्लंड हा कपडय़ांचा शोरुम चोरटय़ांनी फोडला. कपडे व रोकड मिळून तब्बल 1 लाख 82 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केला. हा चोरीचा प्रकार शोरुमच्या ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला असून त्यात तीन चोरटे दिसत आहेत. विशेष म्हणजे चोरटय़ांनी ही चोरी अवघ्या दहा मिनिटांमध्ये केली आहे. गेल्या काही दिवसांत कणकवलीत चोरीच्या घटना वाढल्या असून पोलीस मात्र कोणालाही पकडू शकलेले नाहीत, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
घटनेनंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, फॉरेन्सिक लॅब, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरटय़ांचा मागमूस लागू शकलेला नाही. काही दिवसांपूर्वीच येथील भूमी अभिलेख कार्यालय चोरटय़ांनी फोडले होते. तर त्या आधीही काही घरफोडय़ा झाल्या. मात्र, चोरटय़ांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढत चालली आहे.
भल्या सकाळी घटना उघडकीस
येथे महामार्गाला लागूनच, एस. एम. हायस्कूलच्या बाजूला संकेत श्रीधर नाईक (कणकवली) यांचा पीटर इंग्लंड हा कपडय़ांचा शोरुम आहे. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास दुकान बंद करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास येथील नागरिकांना शोरुमचे शटर उचकटलेले दिसून आले. याबाबत नागरिकांनी तात्काळ नाईक यांना कळविल्यानंतर शोरुममधील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाहणीत शोरुममधील कपडे ठेवण्याच्या रॅकमधील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. दुसऱया रॅकवरील कपडे चोरीस गेलेले दिसून आले. याचवेळी काऊंटर उघडाच असल्याने तेथील तपासणी केली असता, आतील रक्कम चोरीस गेल्याचे दिसले.
पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरीस
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये पीटर इंग्लंड कंपनीच्या शर्ट्स, बॉडी प्रे, पँट आदींचा समावेश आहे. यात 54 हजार 945 रुपयांची 55 शर्ट्स, 2 हजार 985 रुपयांचे 15 डिओडंड बॉडी प्रे, 22 हजार 475 रुपयांचे 25 टीशर्टस्, 29 हजार 985 रुपयांचे 15 स्वेटर्स, 52 हजार 465 रुपयांच्या 35 पँट तसेच काऊंटरमधील 19 हजार 500 रुपये चोरीस गेले आहेत.
चोरटे ‘सीसीटीव्ही’त कैद
हा चोरीचा प्रकार शोरुममधील ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला आहे. यात पहाटे 4 वा. सुमारास आलेल्या चोरटय़ांनी शोरुमच्या एका बाजूचे शटर कोणत्या तरी हत्याराने व शरीरबळाचा वापर करत उचकटले. मात्र, तेथून आत जाण्यास ‘एन्ट्री’ नसल्याने चोरटय़ांनी दुसऱया बाजूचेही तशाचप्रकारे शटर उचकटून प्रवेश केला. सोबत आणलेल्या बॅटरीच्या सहाय्याने ते कपडे व अन्य वस्तू शोधत होते. त्यातील एकाने थेट काऊंटर गाठला. काऊंटर उघडाच असल्याने त्याने आतील रक्कम उचलली. या सर्व प्रकारात शोरुममध्ये घुसलेले दोन चोरटे हे शटरच्या बाहेर असलेल्या तिसऱया साथीदाराकडे आतील कपडे पुरवत होते. अखेरीस चोरटय़ांनी हाताला लागतील तेवढे कपडय़ांचे गठ्ठे उचलले व ते बाहेर येत पसार झाल्याचे ‘सीसीटीव्ही’त दिसून येत आहे.
पोलिसांकडून पंचनामा
शोरुम फोडल्याची माहिती समजताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनीही घटनास्थळ गाठले होते. यावेळी श्वानाला घटनास्थळावरील वस्तूंचा वास देऊन फिरविण्यात आले. मात्र, श्वान घटनास्थळापासून फिरत काही अंतरावरीलच गंगो मंदिरनजीक घुटमळला.
गुन्हा दाखल
घटनेबाबत शोरुमचा कर्मचारी शुभम सुभाष देसाई (21, रा. कळसुली- गावडेवाडी) याने फिर्याद दिली. त्यानुसार चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
चोरटे सऱहाईत
विशेष म्हणजे चोरटय़ांनी शटरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न न करता, कोणत्या तरी हत्याराने थेट शटर उचकटून ही चोरी केली. अवघ्या दहा मिनिटांत पावणेदोन लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले होते. कदाचित घटनास्थळापासून नजीकच त्यांचे वाहन उभे असावे, असा अंदाज पोलीस व्यक्त करत होते. अवघ्या दहा मिनिटात चोरी करणारे हे चोरटे नक्कीच सऱहाईत असावेत, असेही पोलिसांनी सांगितले.