वार्ताहर/ कणकवली
कणकवली शहरात दुचाकी वापराला प्रतिबंधाच्या जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाची बुधवारी सकाळपासूनच कडक अंमलबजावणी करण्यात आली. विनाकारण फिरणाऱयांवर भा. दं. वि. कलम 188 चा भंग केल्याबद्दल कारवाईची धडक मोहीम सुरू करताच अनेक दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले. दिवसभरात सुमारे …… दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. यात 50 हून अधिक दुचाकी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी बुधवारी सकाळी कणकवली पटवर्धन चौकात येऊन कणकवली पोलिसांच्या कारवाईचा आढावा घेतला.
मंगळवारी कणकवली शहरात मोठय़ा प्रमाणात जनतेने गर्दी केली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतरही या नियमाचे पालन केले गेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी स्तरावरून गांभिर्याने घेऊन नागरी क्षेत्रात फिरणाऱया दुचाकीच्या वापराला बंदी करण्यात आली. मंगळवारी सायंकाळपासूनच याची कणकवली पोलिसांनी काटेकोर अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी शहरात गस्त सुरू करत विनाकारण फिरणाऱयांना समज दिली. त्यानंतर शहरात महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले होते. यात भालचंद्र महाराज आश्रमाकडे जाणारा रस्ता, पटवर्धन चौकातून बाजारपेठेत जाणारा रस्ता, डीपी रोड, पटकीदेवी मंदिराकडून नागवेकडे जाणारा रस्ता, छ. शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालयाकडील रस्ता, नरडवे रोड आदी ठिकाणी बॅरिकेटस् लावून शहरात येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
दुचाकी पोलीस ठाण्यात जमा
बुधवारी सकाळपासूनच शहरात कणकवली पोलीस, दंगल नियंत्रक पथक व जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस पटवर्धन चौकात कार्यरत होते. महामार्गावर नरडवे रस्ता, तहसील कार्यालयाकडील रस्ता, डीपी रोड आदी भागात वाहतूक पोलीस तैनात होते. शहरात फिरणाऱया दुचाकीस्वारांची कसून चौकशी करण्यात येत होती. अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असणाऱया दुचाकीस्वारांना चौकशी करून सोडण्यात आले, तर जे विनाकारण फिरताना सापडले, त्यांच्यावर कारवाईसाठी त्यांच्या दुचाकी ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या. या कारवाईची माहिती मिळताच 11 पासून शहरात दुचाकी व अन्य वाहनांची वर्दळ काही प्रमाणात नियंत्रणात आली होती.