भल्या पहाटे दुर्घटना : 91 लाखांचे नुकसान : पारंपरिक औषधांचा खजाना जळून खाक
प्रतिनिधी / कणकवली:
येथील मुख्य बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रींक्स हाऊस व रामचंद्र बाबाजी उचले किराणा आयुर्वेदिक औषधांचे दुकान पूर्णत: आगीच्या भक्षस्थानी पडले. तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांचे दुकान व राहत्या घरालाही आगीची झळ पोहोचली. नगर पंचायतीच्या अग्निशामक बंबासह सावंतवाडी नगरपालिका, कुडाळ एमआयडीसीचा बंब, दिलिप बिल्डकॉनच्या टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दोन्ही दुकानांना जुने लाकूड साहित्य असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. यात दोन्ही दुकानांसह अंधारी यांचे 91 लाखांचे नुकसान झाले.
पहाटेच आगीचे रौद्ररुप
आगीचे नेमके कारण समजले नसले, तरी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊसमधून मोठय़ा प्रमाणात धूर व आगीचे लोट येऊ लागले. लगतच्या नागरिकांना याबाबत कल्पना आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची शेजाऱयांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग कोल्ड्रिंक्सलगतच्या उचले किराणा दुकानाच्या दिशेने व दुसऱया बाजूने अंधारी यांचे दुकान व घराच्या दिशेने पसरली.
अग्निशामक बंब दाखल
नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने अग्नीशामक बंब बोलविला. तसेच दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर मागविण्यात आला. रात्रपाळीच्या डय़ुटीवर असलेल्या होमगार्डनी पोलीस यंत्रणेला कळविले. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले, मात्र आग आटोक्मयात येत नव्हती. त्यानंतर कुडाळ एमआयडीसी, सावंतवाडी नगरपालिका यांचेही बंब मागविण्यात आले. या साऱयांच्या प्रयत्नाने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला.
स्थानिकांची मदत
यावेळी नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी, भाई साटम, प्रसाद अंधारी, अमित सापळे, नाना सापळे, प्रद्युम मुंज, बापू पारकर, हर्षल अंधारी, आदित्य सापळे, आशिष वालावलकर, संजय मालंडकर, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, राजन पारकर, दिलीप वर्णे, रुपेश खाडये, प्रणव कामत, संदीप अंधारी, प्रसन्ना देसाई, सुशिल पारकर, अनंत पारकर, उमेश वाळके, अक्षय डिचोलकर, अनिल पवार, नागेश डिचोलकर, वैभव आरोलकर, तन्मय नार्वेकर, मनोज धुमाळे, गणेश लाड तसेच कणकवली नगर पंचायतीचे कर्मचारी व नागरिक सहकार्य करीत होते. मात्र, दोन्ही दुकानांना जुन्य पद्धतीत लाकडी पोटमाळा व लाकूड साहित्य असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे दोन्ही दुकाने पूर्णत: आगीच्या भक्षस्थानी पडली. तर आगीची काही प्रमाणात झळ अंधारी यांचे दुकान व घरालाही बसली. त्या पुढील दुकानांना झळ बसू नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने आग लागलेल्या इमारतींचा इतर दुकानांशी असलेला संपर्क तोडण्यात आला.
आमदार नाईक, प्रांताधिकाऱयांची भेट
दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सौ. राजमाने व पवार यांनी मंडळ अधिकारी संतोष नागावकर तसेच महसूल कर्मचाऱयांना पंचनाम्याबाबत सूचना दिल्या.
आमदार राणेंकडून पाहणी
दरम्यान, आमदार नीतेश राणे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, अण्णा कोदे, संजय कामतेकर, अभी मुसळे, अनिकेत उचले, राजू मानकर व इतर उपस्थित होते. राणे यांनी बजाजी, उचले व अंधारी यांची भेट घेत धीर दिला.
मंडळ अधिकारी संतोष नागावकर, तलाठी व्ही. एम. कांबळे, प्रवीण वळंजू, सुवर्णा कडुलकर व गोपाळ वर्दम यांनी पंचनामा केला. त्यानुसार दुकान मालक शिवप्रसाद उचले यांच्या किराणा व पारंपरिक आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांचे मिळून 65 लाख 5 हजार रुपयांचे नुकसान झाले. शिवप्रसाद उचले यांच्या जागेतील राजकुमार बजाजी यांच्या जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊसचे 12 लाख 85 हजार, गुरुनाथ अंधारी यांच्या दुकानाचे 11 लाख 10 हजार रु., तर सविता अंधारी यांच्या चप्पल दुकानाचे 1 लाख 95 हजार रुपयांचे असे मिळून 90 लाख 95 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही दुकानांना लागलेली आग विझविणेही कठिण होत होते. दुकानांना असलेल्या लाकूड साहित्याने पेट घेतल्याने रस्त्याच्या पलिकडेपर्यंत झळा बसत होत्या. रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला असलेल्या दुकानांचे डिजिटल बोर्डही यात वितळून गेले. दरम्यान, आगीच्यावेळी कोल्ड्रिंक्स हाऊसमधील मोठय़ा फ्रिजचे कॉप्रेसर तसेच बाटल्यांचा स्फोट होत असल्याने सातत्याने छोटय़ा-छोटय़ा स्फोटासारखा आवाज येत होता. त्यामुळे आग विझविण्याच्या कामातही सावधगिरी बाळगावी लागत होती.
128 वर्षांपूर्वीचे पारंपरिक आयुर्वेदिक दुकान खाक
उचले यांचे किरणा व पारंपरिक आयुर्वेद दुकान हे कणकवलीतील पारंपरिक काष्टौषधी मिळण्याचे तसे एकमेव ठिकाण. उचले यांच्या दुकानात किरणासह आयुर्वेदिक आजीच्या बटव्यातील कोणते औषध मिळाले नाही, असे कधी झाले नाही. जिल्हाभरातून लोक येथे या औषधांसाठी येत असत. त्यांच्याकडे जुन्या पारंपरिक आयुर्वेदिक व काष्टौषधीचा मोठा साठा होता. मात्र, हे सर्व अनमोल साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले.