पोलिसांशी वाद घालताना केला होता कारचा वापर
कणकवली:
‘लॉकडाऊन’ असतानाही रस्त्यावर फिरत असताना विचारणा केल्यावर जावेद शेख याने पोलिसांशी हमरीतुमरी केल्याने तसेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत पोलिसांशी हुज्जत घातल्याबाबतच्या तीन आठवडय़ांपूर्वी घडलेल्या प्रकरणी नगराध्यक्षांसाठी असलेली टोयोटा इटॉस ही शासकीय कार कणकवली पोलिसांनी सोमवारी जप्त केली. संशयित आरोपींनी या गुन्हय़ासाठी याच कारचा वापर केला होता, अशी माहिती कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक बनकर यांनी दिली.
दरम्यान, घटनेतील नगराध्यक्षांसह तीन संशयित आरोपींना अद्यापही अटक झाली नसल्याबाबत विचारले असता, तपासाअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे बनकर यांनी सांगितले.
ही घटना 16 एप्रिलला घडली हेती. याबाबत पोलीस नाईक आशिष जामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, येथील पटकीदेवी मंदिर परिसरात सातत्याने फिरत असल्याबाबत जावेद शेख याला विचारणा केली असता, त्याने पोलिसांशी हुज्जत घातली होती. पुढे जावेद याला पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले, तेव्हा नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे यांनीही पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जावेद याला अटकही झाली.
दरम्यान, संशयित कणकवली पोलीस ठाण्यात नगराध्यक्षांसाठी असलेल्या कारने दाखल झाले होते. म्हणूनच पोलिसांनी सोमवारी या वाहनाच्या चालकाशी संपर्क साधून ही कार (एमएच 07 एजी 3700) पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितले. त्यानुसार चालकाने कार तेथे आणल्यानंतर चालकाचाही जबाब घेण्यात आला. अखेरीस ही कार जप्त करण्यात आल्याचे बनकर यांनी सांगितले.