काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यावर इतर कर्मचाऱयांचे अहवाल निगेटिव्ह
डायलेसीससह इतर रुग्णसेवा व्यवस्थित सुरू
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांची माहिती
–
कणकवली
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील ‘कोरोना पॉझिटिव्ह’ सापडलेल्या डॉक्टरसह पाचही कर्मचाऱयांच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱयांच्या ‘स्वॅब टेस्ट’ करण्यात आल्या असून त्या ‘निगेटिव्ह’ आहेत. साहजिकच उपजिल्हा रुग्णालयाला मधल्या काही दिवसांत निर्माण झालेला कोरोनाचा धोका सध्या तरी टळला असून रुग्णालय सुरळीत सुरू असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांनी दिली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या पाचही कर्मचाऱयांची प्रकृतीही स्थिर आहे. उपजिल्हा रुग्णालयात हर्नियाच्या उपचारासाठी 11 ऑगस्टला आलेल्या एका रुग्णाचा अहवाल 13 ऑगस्टला ‘पॉझिटिव्ह’ आला होता. त्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एनआरएचएम अंतर्गत सेवा देणाऱया एका डॉक्टरचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान, या डॉक्टरच्या संपर्कात आल्याने रुग्णालयाच्या एका विभागात काम करणाऱया चार कर्मचाऱयांनाही काही अंतराने कोरोनाची लागण झाली. दुर्दैवी म्हणजे या कर्मचाऱयांच्या संपर्कात आल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तीन रुग्णांनाही कोरोनाची लागण झाली होती. परिणामी संपूर्ण रुग्णालयालाच कोरोनाची भीती निर्माण झाली होती.
‘पॉझिटिव्ह’ आलेल्या कर्मचाऱयांच्या संपर्कातील अन्य कर्मचारीही मोठय़ा संख्येने असल्याने, इतर कर्मचाऱयांना क्वारंटाईन करावे लागल्याने रुग्णालयाच्या मनुष्यबळावरही मोठा परिणाम झाला होता. दरम्यान, या कर्मचाऱयांच्या, रुग्णांच्या ‘स्वॅब टेस्ट’ घेण्यात आल्या. त्याचे अहवाल मागील दोन दिवसांत मिळाले असून ते ‘निगेटिव्ह’ आहेत. साहजिकच सर्व कर्मचाऱयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
डायलेसीस सेंटरही सुरळीत! ‘कोरोना पॉझिटिव्ह’ मिळालेले कर्मचारी हे डायलेसीस सेंटरमध्ये कार्यरत होते. परिणामी तेथील कर्मचारी संख्याच कमी झाल्याने डायलेसीस सेंटरच्या कामावर मोठा परिणाम झाला होता. ‘कोरोना’चा प्रभाव वाढला असता, तर डायलेसीस सेंटरसह सबंध रुग्णालयच बंद करण्याची परिस्थिती ओढवू शकली असती. मात्र, आता ‘पॉझिटिव्ह’ कर्मचाऱयांच्या संपर्कातील कर्मचाऱयांच्या ‘स्वॅब टेस्ट’ निगेटिव्ह आल्याने डायलेसीस सेंटरही सुरळीत सुरू झाल्याचे डॉ. पाटील म्हणाले.