गोविंद गावडे नाटय़अभिनयात पोहोचला मुंबईला : ऐतिहासिक नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत अभिनय
वार्ताहर /कणकुंबी
जिद्द, अपार, मेहनत, परिश्रम, सातत्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. अशाच पद्धतीने कणकुंबी येथील एका ध्येयवेडय़ा नाटय़कलाकाराने कणकुंबी, गोवा ते मुंबई राज्यपातळीवरील नाटय़महोत्सवात पोहोचून कणकुंबीचे नाव उज्ज्वल केले आहे.
कणकुंबी येथील गोविंद उर्फ तात्या लक्ष्मण गावडे याने मुंबई (दादर) येथील श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहात पार पडलेल्या नाटय़महोत्सवातील दोन ऐतिहासिक नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत अभिनय करून कणकुंबीचे नाव गोवा आणि महाराष्ट्राच्या नाटय़ कलाक्षेत्रात उमटविले. कणकुंबी गावातील नाटय़परंपरा आणि येथील नाटय़ कलाकार यांचा विचार केला तर संगीत भजन आणि नाटकं ही कला काही युवकांच्या अंगी उपजतच असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 2007 मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्याबरोबर गोविंद गावडे याने नाटय़अभिनय क्षेत्रात पदार्पण करून आपल्या अंगी असलेल्या अभिनयाची छाप उमटवली. दरवषी शिमगा, होळी, हनुमान जयंती किंवा दत्त जयंती अशा विविध उत्सवामधील होणाऱया जवळपास 40 नाटकांमध्ये भाग घेऊन नाटय़अभिनय जोपासला आहे. यामध्ये शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रमुख भूमिका केल्या आहेत.
विशेषतः ऐतिहासिक, पौराणिक, काल्पनिक व सामाजिक अशा विविध 40 नाटकांमध्ये भाग घेऊन प्रमुख भूमिका बजावलेला युवक गोविंद उर्फ तात्या गावडे आपल्या अभिनयाची छाप त्याने गोव्यापर्यंत उमटविली. गोव्यातील अनेक ठिकाणी नाटय़ कलामंच यांच्यावतीने अशा कलाकारांचा शोध घेऊन प्राधान्य दिले जाते. गोविंद गावडे याने गोव्यातील नाटय़ मंडळांच्या अनेक ऐतिहासिक, काल्पनिक, सामाजिक व पौराणिक अशा नाटकात वेगवेगळय़ा भूमिका करून गोव्याच्या रंगमंचावरसुद्धा अभिनयाची छाप पाडली.
गोवा कला सांस्कृतिक संचालनालयात स्थान
गोवा शासनातर्फे चालवण्यात येणाऱया कला सांस्कृतिक संचालनालय या नाटय़ संस्थेत आपले स्थान मिळविले. त्यानंतर मुंबईमध्ये नुकताच राज्य पातळीवरील नाटय़महोत्सव पार पडला. या नाटय़महोत्सवात 30 आणि 31 ऑक्टोबर असे दोन दिवस मुंबई येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कला पुरस्कार प्रति÷ान आणि कला सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई दादर येथे श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहात नाटय़महोत्सवाचे आयोजन केले होते.
यावेळी गोव्यातील विमलानंद कलामंच गोवा प्रस्तुत ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हा नाटय़प्रयोग 30 रोजी झाला. तर 31 ऑक्टोबर रोजी ‘शिव आलिंगन’ हा नाटय़प्रयोग करण्यात आला. यापैकी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात हंबीरराव मोहिते तर शिव आलिंगन नाटकात नेताजी पालकरची भूमिका केली.
कणकुंबी भागातील नाटय़रसिक कलाप्रेमींच्यादृष्टीने अभिमानाची गोष्ट
याप्रसंगी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेते विजय पाटकर व कला पुरस्कार प्रति÷ानचे अध्यक्ष किरण कुडाळकर यांनी गोविंद गावडे यांच्या नाटय़ अभिनयाबद्दल कौतुक केले. मुंबई येथे वास्तव्यास असलेले उद्योजक नारायण वांदे यांनी गोविंद गावडे याचा सत्कार केला.
कणकुंबी तसेच गोव्यातील विविध रंगमंचावरील नाटकांमध्ये काम केल्यानंतर गोविंद गावडे हा मुंबईमध्ये झालेल्या नाटय़महोत्सवात भाग घेऊन आपली नाटय़ अभिनय कला सादर करतो. ही कणकुंबी भागातील नाटय़ रसिक कलाप्रेमींच्यादृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.