वार्ताहर / सांबरा :
कणबर्गी येथे शेतकऱयांनी स्वखर्चाने केगदी नाल्याची दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने नाल्याला पूर आला होता. त्यामुळे परिसरातील भात पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले होते. या दरम्यान नाल्याचा बांध जागोजागी फुटून नुकसान झाले होते. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱयांनी स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने नाल्याची दुरुस्ती करवून घेतली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून नाल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. काही अंतराचे काम माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी स्वखर्चातून करवून दिले आहे. केगदी नाला हा शिवारातील एक महत्त्वाचा नाला असून शेतकऱयांसाठी तो फार उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे नाल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.