सात जुगाऱ्यांना अटक, 2 लाख रुपये, 5 मोबाईल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी (ता. बेळगाव) येथील एका घरात सुरू असलेल्या जुगारी अड्डय़ावर शुक्रवारी मध्यरात्री सीईएन पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सात जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या जवळून 2 लाख 10 हजार रुपये रोख रक्कमत व पाच मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. भैरगौडा पाटील याच्या घरात जुगारी अड्डा थाटण्यात आला होता. याची माहिती मिळताच सीईएन विभागातील अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून सात जुगाऱयांना अटक केली असून जप्त मोबाईलची किंमत 40 हजार रुपयां इतकी होते.
भैरगौडा जोतिबा पाटील (वय 42, रा. कणबर्गी), अनिकेत अशोक पाटील (वय 33, रा. विष्णू गल्ली-वडगाव), वज्रय्या मनोहर वेर्णेकर (वय 38, रा. अंकलगी, ता. गोकाक), राकेश शाम नंदगडकर (वय 36, रा. चव्हाट गल्ली), बसवराज कल्लाप्पा नभापुरी (वय 37, रा. अंकलगी, ता. गोकाक), गदग्याप्पा बसाप्पा तळवार (वय 48, रा. एम. के. हुबळी), शिवानंद सिध्दगौडा भरमशेट्टी (वय 28, रा. मठ गल्ली-कणबर्गी) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱयांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. या सर्व सात जुगाऱयांवर कर्नाटक पोलीस कायद्याबरोबरच संसर्गजन्य रोगराई प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले असून बेळगाव पोलिसांनी जुगारी अड्डय़ावरील कारवाईत जप्त केलेली अलिकडच्या काळातील ही मोठी रक्कम आहे. या कारवाईने जुगारी अड्डे चालकांत खळबळ माजली आहे.