प्रतिनिधी/ बेळगाव
यमनूर येथील श्री चांगदेव उर्फ राजाबागसवार (अज्जा) यांचा यात्रा महोत्सव साधेपणाने करण्यात येणार आहे. दि. 1 एप्रिलपासून यात्रोत्सवाला सुरुवात होणार असून दि. 6 एप्रिलपर्यंत ही यात्रा चालणार आहे. त्यानिमित्त बेळगाव येथेही यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. चांगदेवनगर, दुसरा बसस्टॉप, कणबर्गी येथे हा महोत्सव होणार आहे. ही यात्राही साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. 1 रोजी चांगदेव अज्जांचा पालखी सोहळा निघणार असून श्री सिद्धेश्वर देवस्थान व करेम्मा देवी मंदिर ऑटोनगर येथे भेट देऊन सायंकाळी श्रीगंध अभिषेक घालण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 2 रोजी दुपारी 12.55 वाजता महापूजा, त्यानंतर महाप्रसाद आरंभ, भजन, कीर्तन कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता पालखीच्या मंदिर प्रदक्षिणा घालण्यात येणार आहेत.
शनिवार दि. 3 रोजी दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी अश्वपूजा व पालखीच्या मंदिर प्रदक्षिणा, रविवार दि. 4 रोजी 7 वाजता पालखीच्या मंदिर प्रदक्षिणा, नंतर महाप्रसाद, सोमवार दि. 5 रोजी 1 वाजता महापूजा व महाप्रसाद, याच दिवशी दंडवत कार्यक्रम, संध्याकाळी पालखीच्या मंदिर प्रदक्षिणा, 5 वाजता गुरुपूजेचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार दि. 6 रोजी संध्याकाळी 5 वाजता रथोत्सव आणि भंडार हबीर उत्सव आहे. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. ही यात्रा कोरोनाचे सर्व नियम पाळून केली जाणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चांगदेव उर्फ राजाबागसवार सेवा कमिटी बेळगाव आणि बेंगळूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.