प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहर आणि उपनगराचा विकास केला जात आहे. मात्र कणबर्गी परिसरातील समस्या सोडविण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. सिध्देश्वर नगरमधील कन्नड शाळेमागील रस्त्यावरील सीडी पूर्णता निकामी झाले असून ढासळत चालले आहे. कोणत्याहीक्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे.
येथील समस्या पाहता महापालिकेच्या विकासाच्या अजेंडय़ामधून कणबर्गी परिसर वगळण्यात आला आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कणबर्गी परिसरात अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच कचऱयाची उचल वेळेवर केली जात नाही. त्याचप्रमाणे कणबर्गी परिसरातील विविध समस्या सेडविण्याकडे महापालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. येथील समस्या मोठय़ा असल्याने निधी नसल्याचे कारण पुढे करून कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे. नागरिकांना भेडसावणाऱया समस्या सोडविण्याकडे देखील महापालिकेने दुर्लक्ष केले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आहे.
सिध्देश्वर नगरमधील कन्नड शाळेमागील रस्त्यावर गटार असून गटारीवरील सीडी खराब झाला आहे. सीडी जीर्ण झाली असल्याने आता ढासळू लागले आहे. रस्त्यावर मध्यभागी भगदाड पडले असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. या सीडीवरून दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची ये-जा होत असते. यामुळे सीडी कोणत्याहीवेळी कोसळण्याची शक्यता आहे. पण याकडे महापालिकेच्या आधिकाऱयांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याची दखल घेवून नवीन सीडी घालण्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.