वृत्तसंस्था/ डोहा
कतारमध्ये फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेला रविवारपासून मोठय़ा थाटात प्रारंभ होणार आहे. कतारमध्येच नव्हे तर सर्व युरोपियन देशामध्ये फुटबॉलच्या महासंग्रामाची शौकीन आतुरतेने वाट पाहात आहेत. मुस्लीम देशामध्ये पहिल्यांदाच फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा भरविली जात असून या देशातील कायदे अत्यंत कडक आहेत. फुटबॉल स्टेडियमच्या सभोवार शौकिनांसाठी बियर विक्रीवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती फिफाच्या नियंत्रण समितीने दिली आहे.
या निर्णयासंदर्भात फिफाचे वरिष्ठ अधिकारी आणि यजमान देशाच्या अधिकाऱयांमध्ये बरीच चर्चा झाली. फिफाची ही स्पर्धा शौकिनांसाठी जत्राच असते. कतारमधील फिफा 2022 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या विविध स्टेडियम्सच्या परिसरात बियर विक्रीवर पूर्णपणे निर्बंध घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एबी इनबेव्ह यांच्या मालकीच्या ‘बुडवायजर’ ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱया बियरचे प्रमुख उत्पादक आहेत. तसेच ते फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्तेही आहेत. कतारमध्ये या स्पर्धेसाठी 8 स्टेडियम्स सज्ज करण्यात आली आहेत. या स्टेडियममध्ये होणाऱया सामन्यापूर्वी तीन तास अगोदर तसेच सामना संपल्यानंतर एक तासाच्या कालावधीकरिता बियर विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.