गोवा मीट कॉम्प्लेक्स लवकर सुरू करा
प्रतिनिधी / मडगांव
ऐन नाताळ सणात सद्या गोव्यात ‘बीफा’ची प्रचंड कमतरता भासू लागली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे बोलणी करून कत्तल करण्यायोग्य गुरे गोव्यात आणावी व गोवा मीट कॉम्प्लेक्स मध्ये कत्तल करावी अशी दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी केली आहे.
काल बुधवारी काँग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खा. सार्दिन यांनी वरील मागणी केली. सद्या कर्नाटकात गोहत्त्या बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे गोव्याला बीफ उपलब्ध होणे कठीण होऊन बसलेले आहे. सद्या दिल्लीतून बीफ गोव्यात आयात केले जात आहे. त्यामुळे बीफचा दर देखील प्रचंड वाढलेला आहे. गोवा सरकारने त्यावर उपाय योजना आखावी अशी मागणी खा. सार्दिन यांनी केली आहे.
उसगांव येथील गोवा मीट कॉम्प्लेक्स बंद असल्याने गोव्याला बीफ साठी इतर राज्यांवर अवलंबून रहावे लागते. सरकारने लवकरात लवकर गोवा मीट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
संजीवनी साखर कारखान्याबाबत बोलताना खा. सार्दिन म्हणाले की, ‘सरकार शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा बोलत आहे. पण, प्रत्यक्षात बंद करण्यात आलेल्या संजीवनी साखर कारखान्यासंदर्भात काहीच करीत नाही. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकऱयांवर अन्याय होत आहे. शेतकऱयांना केवळ खोटी आश्वासने देण्याचे काम सरकार करीत आहे. बाणावली येथील कोळंबी पैदास केंद्र सरकारने खाजगीकरण केले आहे. त्यातून सरकारची एकूण कृती स्पष्ट होत आहे.
सहकारी बँकांच्या कामात सरकार हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सहकारी बँकांनी सामान्य लोकांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. सरकारने बँकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रकार बंद करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.