कथाकार बाबासाहेब परीट यांनी विनोदी पद्धतीने मांडल्या कथा : नाथ पै व्याख्यानमालेची सांगता
प्रतिनिधी / बेळगाव
विमानातून केलेली पहिली सिंगापूरची वारी ही विनोदी ढंगाने सादर करून कथाकार बाबासाहेब परीट यांनी बेळगावमधील श्रोत्यांना पोट धरून हसायला लावले. ग्रामीण भागातील व्यक्ती जेक्हा पहिला विमान प्रवास करते त्यावेळी होणाऱया गमती-जमती त्यांनी कथेतून मांडल्या. तर ‘शिकार’ या दीर्घ कथेतून त्यांनी ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविले.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत सांगलीचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार बाबासाहेब परीट यांनी कथा मांडल्या. व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा सुनिता मोहिते, उपाध्यक्ष नेताजी जाधव, ऍड. आय. जी. मुचंडी, रघुनाथ मुचंडी उपस्थित होते.
सिंगापूर येथे भरविण्यात आलेल्या संमेलनासाठी सर्व लेखक निघाले होते. यावेळी विमान प्रवासात एक ग्रामीण वयोवृद्ध व्यक्ती बाजुला बसते, बसप्रमाणे प्रत्येक सवयी विमानामध्येही करण्याचा प्रयत्न करते. यामुळे होणाऱया गमती जमती, तसेच संमेलनाच्यावेळी होणारे विनोदी किस्से परिट यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून मांडले.
वाजपेयी, दंडवते व पै यांनी संसदेचे पावित्र्य राखले
भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, मधू दंडवते व नाथ पै यांनां देशाच्या संसदेचे पावित्र्य राखले आहे. एक उत्तम राजकारणी कसा असावा हे त्यांनी देशाला दाखवून दिले आहे. गावात किती उंच इमारती आहेत, यापेक्षा वाचनालयांची उंची किती आहे यावरून वैचारिक समृद्धी दिसून येते. इतिहासात धनवंताची नाही तर गुणवंताची दखल घेण्यात आली असल्याने गंथालयांची संख्या वाढवा, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी वाचनालयाचे उपाध्यक्ष नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. वाचनालयाच्या अध्यक्षा सुनिता मोहिते यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
बेळगाव हे महाराष्ट्राचे हृदय
महाराष्ट्रात राहून मराठीवर जितके प्रेम तेथील नागरिक करीत नाहीत त्याहून अनेक पटीने बेळगावचे नागरिक महाराष्ट्रापासून दूर राहून मराठीवर प्रेम करीत आहेत. बेळगावच्या ग्रामीण संमेलनाला यापूर्वी उपस्थित राहता आल्याने येथील मराठीबद्दलची तळमळ पाहिली आहे. त्यामुळे बेळगाव हे महाराष्ट्राचे हृदय आहे, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो असे बाबासाहेब परीट यांनी सांगितले.