प्रतिनिधी / मडगाव
शिरदोण येथील एक महिला ऐन गणेश चतुर्थीच्या वेळी आपली बॅग कदंब बसमध्ये विसरून गेली. या बॅगमध्ये तिचे सोन्याचे दागिने होते. ही बॅग बसचा कंडक्टर मंगेश नाईक व ड्रायव्हर राजेश उपासकर यांना सापडली. त्यांनी ती जपून ठेवली व त्या महिलेला प्रामाणिकपणे बॅग परत दिली.
सोन्याचे दागिने असलेली आपली बॅग हरविल्याने ही महिला दडपणाखाली होती. या महिलेने बॅगची शोधाशोध सुरू केली व कदंब बसमधून प्रवास केल्याने तिने कदंबाकडे संपर्क साधला असता कंडक्टर मंगेश नाईक व ड्रायव्हर राजेश उपासकर यांनी तिची बॅग पुन्हा तिच्याकडे सुपूर्द केली. सोन्याच्या दागिन्यासह बॅग परत मिळाल्याने त्या महिलेचा जीव भांडय़ात पडला. तिने कंडक्टर व ड्रायव्हरचे आभार मानले.
मडगावातही एक पाकीट सापडले
दरम्यान, काल गुरूवारी मडगाव मार्केटात एक पाकीट सापडले. या पाकीटात रोख रक्कम तसेच सोन्याची एक अंगठी तसेच एटीएम कार्ड तसेच मुलाचे ओळखपत्र होते. मडगाव मार्केटात पाकीट सापडल्याचा व्हिडिओ वॉटस्अपवर व्हायरल करण्यात आल्यानंतर कुंकळळी येथील एका महिलेचे पाकीट असल्याचे स्पष्ट झाले. त्या महिलेकडे हे पाकीट सुपूर्द करण्यात आले.