हेटाळणी करणारे लोक आता मागतात ऑटोग्रॉफ
न्यूझीलंडमधील टायला क्लेमेंटला एक अत्यंत दुर्लभ आजार आहे. यामुळे ती कधीच हसू शकत नाही. पूर्वी लोक याकरता तिची थट्टा करायचे. परंतु आज ती प्रचंड प्रसिद्ध झाल्याने लोक तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी येत आहेत.
24 वर्षीय टायलाचा जन्म मॉएबियस सिंड्रोमसोबत झाला होता. या आजारात माणूस कधीच हसू शकत नाही. तसेच तो स्वतःच्या भुवया देखील वरच्या दिशेने हलवू शकत नाही. याचबरोबर डोळय़ातील बुब्बुळे देखील हलवू शकत नाही. टायलाला या आजारामुळे लोक अपशकुनी ठरवू लागले होते.
हा सिंड्रोम 40 लाख लोकांमध्ये एकालाच असतो. या सिंड्रोममध्ये चेहऱयाच्या स्नायूंना लकवा होतो, यामुळे माणूस स्वतःच्या चेहऱयावरील हावभाव बदलू शकत नाही. या सिंड्रोमवर कुठलाच कायमस्वरुपी उपचार नाही. परंतु काही प्रमाणात तो बरा केला जाऊ शकतो.
कधीच हसता येत नसल्याने टायला अत्यंत उदास राहायची. तिला लहानपणापासूनच अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागत होत्या. परंतु आता टायलाचे जीवन बदलले आहे. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झाली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.
याचबरोबर टायला एक पॅरालिंपिक रिकॉर्ड होल्डर आहे. टायलाने 2018 मध्ये मेलबर्नमध्ये आयोजित व्हिक्टोरियन स्टेट चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. तेथे तिने शॉट पूट थ्रोमध्ये पहिला क्रमांक मिळविला होता. तर पुढील वर्षी न्यूझीलंड राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत तिने 8.28 मीटर अंतरापर्यंत गोळा फेकून विश्वविक्रम केला होता.
या आजारामुळे लहानपणी अनेक लोक चिडवायचे. शाळेतील मुले माझ्या चेहऱयामुळे भीती वाटत असल्याचे सांगायचे. माझी चेष्टा करून ते पळायचे. शिक्षक देखील माझ्यासोबत अजब वर्तन करत होते. परंतु हसता न येणे माझ्यासाठी मोठे वरदान ठरले आहे. मी स्वतःचे जीवन आणि त्यापासून इतरांना मिळालेल्या प्रेरणेमुळे आनंदी असल्याचे ती सांगते.
टायलाच्या आईवडिलांनी अनेकदा शस्त्रक्रियेद्वारे तिच्यावर उपचार करविण्याचा प्रयत्न केला. परंतु याचा कुठलाच लाभ झालेला नाही. टायला आता केवळ स्वतःसारख्या लोकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करते. लोक देखील तिच्यामुळे अत्यंत प्रभावित असून तिच्या जीवनाकडून शिकवण घेण्याचा प्रयत्न करत आहेत.